कापूर उद्योगात क्रांती घडवा

शैलेशचंद्र रायकर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे  गोव्याची आर्थिक िस्थती संपूर्ण बिघडली, उद्योगधंदे आणि व्यवसायांची वाताहात झाली असे समजून निरुत्साही होण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःची  परिस्थिती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला तर राज्याची आणि देशाचीही अर्थव्यवस्था सुधारेल.

कोरोनामुळे  गोव्याची आर्थिक िस्थती संपूर्ण बिघडली, उद्योगधंदे आणि व्यवसायांची वाताहात झाली असे समजून निरुत्साही होण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःची  परिस्थिती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला तर राज्याची आणि देशाचीही अर्थव्यवस्था सुधारेल. यावरील रामबाण उपाय म्हणजे इतरांसाठीही रोजगार निर्माण करण्याची हातोटी.

एखाद्या कार्यालयात बसून कारकुनी करणारा कारकून किंवा आधिकारी जे करू शकत नाही ते एक व्यावसायिक किंवा उद्योजक सहज करू शकतो. त्याच्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यांचा पोटापाण्याचा  प्रश्न सुटतो. सामाजिक आणि आर्थिक िस्थती सुधारायची असेल तर हातात कौशल्य असलेल्यानी उद्योगधंदे वेळ मिळेल त्याप्रमाणे केले तरीही चालतील.

हिंदू धर्मातील प्रत्येक उत्सवात, सणात किंवा इतर विधीच्यावेळी कापराचा उपयोग केला जातो. पण तो का व तो  कुठून  मिळतो याची  पुसटशी कल्पना  ही कित्येकाना नसते. चिमूटभर  कापूर जरी कळशीभर पाण्यात टाकला तरी सपूर्ण पाणी शुध्द बनते आणि मंदिरात ठेवलेले चिमूटभर  तीर्थ आपण प्यालो तरी तोंड साफ होऊन श्‍वासोच्छवास सुरळीत झाल्यासारखा  वाटतो.

अशा ह्या कापराचा व्यवहार, व्यवसाय किंवा धंदा करणारे आपल्याला क्वचितच दिसतात म्हणूनच ह्या  कापराचे भाव दोन हजार रुपये किलोपर्यंत वाढले तरी ते कोणाच्याही ध्यानीमनी राहत नाही. पूजा किंवा इतर धार्मिक विधी असला की आम्ही मिळेल त्या भावाने हा चिमूटभर तरी कापूर खरेदी करतोच. या कापराचा धंदा  कसा करायचा याविषयी अल्प, पण महत्त्वाची  माहिती करून घेऊ. 

आपल्या देशातील बहुतेक उद्योजक सुमात्रा, बर्मा, चीन आणि जपानातून या कापराची आयात करतात आणि त्याची लहान लहान पाकिटे करून किरकोळ प्रमाणात बाजारात विकतात. कापराचे  खडे आणून त्याची पावडर करून महागातील महाग भावात तिची पाकिटे बनवून विकण्यापुरताच हा धंदा मर्यादित आहे. म्हणून हा धंदा करणारे कमवितात.

भारतात प्राचीत काळात कापराची भरपूर झाडे होती. या झाडांपासून भरपूर प्रमाणात कापूर मिळायचा. औषधासाठी या कापराचा उपयोग व्हायचा. ऋषिमुनीनी कापराचा उपयोग धार्मिक विधीवेळी सुरू केला त्यामागील कारण हेच आहे. घरात पूजा असते तेव्हा शेवटी कापूर जाळला जातो. का? कापूर जाळल्यावर घरातील वातावरण शुध्द होतं. आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू केली ती तशीच चालू आहे. पूजेच्या वेळी शेवटी कापराची आरत त्याचसाठी ठेवली जाते.

कापूर हा वातनाशक, कफनाशक असतो. कापूर जाळल्यावर जो धूर येतो तो कीटकनाशक, जंतुनाशक असतो. कोरोनाच्या जंतूचाही ह्या कापराच्या धुरामुळे नाश होऊ शकतो. अँटिबॅक्टेरिअल, अँटिफंगस अशा या धुरामुळे मच्छर येत नाहीत. बारीक बारीक किडे या धुरामुळे मरतात. हा कापूर पाण्यात टाकल्यावर पाणी शुध्द बनते. मंदिरात  ठेवल्या जाणाऱ्या तिर्थात हाच कापूर टाकला जातो.

भारतातील जंगलात अशी झाडे चिक्कार वाढत राहिली तेव्हा माहिती नसल्यामुळे जळावू लाकडासाठी ती कापली गेली. जपानमध्ये दिडशे वर्षापूर्वी अशा कापराचे झाड सापडले आणि जेव्हा तेथील शास्त्रज्ञाना त्याची जाणिव आली तेव्हापासून त्या झाडापासून कापूर मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली. बर्मा, चीन, सुमात्रा आणि जपानातून या कच्च्या कापराची आयात जोरात चालू आहे. या झाडाच्या लाकडाच्या तुकड्या तुकड्यातून कापूर मिळविण्याची प्रकिया सर्वानाच थक्क करण्यासारखी असते.

वेगवेगळ्या देशातून आयात केलेल्या कापराच्या खड्यांची पावडर करून तिचे मशिनच्या मदतीने गोळे करण्यापुरताच हा धंदा मर्यादित  आहे. कापराच्या  गोळ्या बनविण्याचे मशीन फक्त ५०,००० रुपयांना मिळते. त्या मशिनात  ही पावडर घालण्यापूर्वी गोळ्याचा आकार ठरवायचा असतो. या मशिनाच्या मदतीने एका तासात १० ते १२ किलो कापराच्या पावडरच्या गोळ्या बनविता येतात. किराणा दुकानातून कंपोस्ट पावडर विकली जाते. तीच पावडर  कापराच्या गोळ्यासाठी वापरतात. ही पावडर मिळत नसेल तर सुलेखा डॉट कॉम किंवा इंडिया मार्टला फोन केल्यावर ती विकणाऱ्यांची नावे आपल्याला मिळतात किंवा मशिनेही घरपोच पाठविणाऱ्याची नावे, पत्ते ते पाठवितात. या मशिनची मूळ किंमत ५०,००० असली तरी ८५० रुपयांच्या एक किलो पावडरपासून बनविलेल्या गोळ्या विकून धंद्याची सुरवात होऊ शकते. राष्ट्रीयीकृत बॅंकेतून या मशिनसाठी कर्ज  देण्यात  येते. पॅकिंगसाठी काही बेरोजगार मुला-मुलींना व विक्री करण्यासाठी काही विक्रेते ठेवले तर हा धंदा फायद्यातच चालेल.

कापूर हा खाण्याच्या किंवा औषधांच्या नियमावलीत बसत नसल्यामुळे फूड अँड ड्रग कंट्रोल खाते शुध्दतेच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकत नसल्यामुळे काही उत्पादक या गोळ्यांच्या मिश्रणात भेसळ करतात आणि आपला फायदा वाढविण्याचा प्रयत्न करतात. आयुर्वेदाने कापूर, औषधाच्या चैाकटीत ठेवलेला आहे. तो हेतू लक्षात ठेवूनच कापराचा धंदा करायला हरकत नाही.                -

संबंधित बातम्या