पाळोळेत हवा सुसज्ज वाहनतळ

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

दीपावलीच्‍या सुटीच्‍या कालावधीत काही देशी पर्यटक पाळोळे किनाऱ्यावर येतात. मात्र, तेथे वाहनतळाची अपुरी सोय असल्याने पर्यटकांना माघारी फिरावे लागत आहे. 

काणकोण : कोरोना महामारीमुळे पर्यटन व्यवसाय मंदीच्या सावटात आहे. सध्‍या दीपावलीच्‍या सुटीच्‍या कालावधीत काही देशी पर्यटक पाळोळे किनाऱ्यावर येतात. मात्र, तेथे वाहनतळाची अपुरी सोय असल्याने पर्यटकांना माघारी फिरावे लागत आहे. 

पाळोळे किनाऱ्यावर काणकोण पालिकेच्या मालकीचा वाहनतळ आहे. या ठिकाणी एकावेळी सुमारे वीस चारचाकी वाहने पार्क करता येतात. तसेच किनाऱ्याकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी किनाऱ्याकडे जाणारा मार्ग एकेरी करण्याची गरज आहे. पर्यायी रस्ता काढण्याची गरज आहे. दरवर्षी नाताळ व नववर्ष स्वागतासाठी पाळोळे किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होते त्यावेळी पर्यटकांना आपली वाहने एका खाजगी जागेत काही अंतरावर पार्क करून किनाऱ्याकडे पायपीट करावी लागते.

पर्यटक नाराज 
पाळोळे हा जागतिक पर्यटन नकाशावर असलेला सुंदर किनारा आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो देशी व परदेशी पर्यटक या किनाऱ्याला भेटी देत असतात. मात्र, अपुरा वाहनतळ व अरुंद रस्ता यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. पाळोळे किनाऱ्याकडे जाण्यासाठी रिंग रोडची अत्यंत गरज आहे. कोरोना महामारी असूनही दिपावली सुट्टीच्या काळात देशी पर्यटकांनी पाळोळे किनाऱ्याला पसंती दिली. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना काही तासांतच पाळोळेला रामराम करावा लागत असल्‍याचे एक पर्यटन व्यावसायिक व काणकोणचे माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले. 

किनाऱ्याकडे जाण्यासाठी रिंग रोडची आवश्यकता
पाळोळे किनाऱ्याकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. त्यासाठी किनाऱ्याकडे जाणारा पर्यायी एकेरी मार्ग काढणे काळाची गरज आहे. त्यामुळे पाळोळेतील पर्यटन व्यवसायात वृद्धी होणार आहे. त्यासाठी भाजपचे युवा नेते संजू पागी यांनी देवाबाग येथून किनाऱ्याकडे जाणारा पर्यायी रस्ता काढण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे केली आहे. हा रस्ता खासगी जमिनीतून काढावा लागणार आहे. त्यासाठी जमीन संपादन करावी लागणार आहे. तो प्रस्ताव मान्य झाल्यास पाळोळेतील वाहतूक कोंडी व वाहनतळाचा प्रश्न सुटणार असल्याचे पाळोळे येथील एक पर्यटन व्यावसायिक व खासगी जमिनीतील पर्यटन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष पंकज नाईक गावकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या