कामुर्ली-तुये विशेष फेरीबोटीच्या दरात वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

General पेडणे तसेच बार्देश या दोन्ही तालुक्यांना जवळच्या अंतराने जोडणाऱ्या तसेच शापोरा नदीमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामुर्ली-तुयें जलमार्गावरील विशेष फेरीबोट सेवेचे शुल्क डोईजड होत असल्याने त्यात कपात करण्याची जोरदार मागणी दोन्ही तालुक्यांतील लोकांकडून करण्यात येत आहे.

शिवोली  : पेडणे तसेच बार्देश या दोन्ही तालुक्यांना जवळच्या अंतराने जोडणाऱ्या तसेच शापोरा नदीमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामुर्ली-तुयें जलमार्गावरील विशेष फेरीबोट सेवेचे शुल्क डोईजड होत असल्याने त्यात कपात करण्याची जोरदार मागणी दोन्ही तालुक्यांतील लोकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित खात्याकडून ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी पेडणे तसेच बार्देश तालुक्यातील प्रवाशांकडून होत आहे. या भागातील विशेष फेरीबोट सेवेसाठी पूर्वीचा दर शंभर रुपये इतका होता; मात्र, नदी परिवहन खात्याकडून सध्या त्या दरात वाढ करून ती रक्कम दोनशे पन्नास इतकी वाढविण्यात आल्याने सामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फरफट होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

पेडणे तालुक्यातील शेकडो लोक कामाधंद्याच्या निमित्ताने म्हापसा ते पणजी शहराकडे नियमित स्वरूपात ये जा करत असतात. तथापि, पत्रादेवी ते म्हापशापर्यंतच्या महामार्गाचे रुंदीकरण तथा नूतनीकरण केले जात असल्याने तालुक्यातील बहुतेक चाकरमानी लोक म्हापसा शहराकडे ये - जा करण्यासाठी कामुर्ली-तुये जलमार्गावरील फेरीबोट सेवेचा उपयोग करीत असतात.

म्हापसा-पणजी शहराकडे येणारा चोपडे - शिवोलीचा दुसरा मुख्य रस्ता लांब पल्ल्याचा असल्याने बहुतेकांची येथील कामुर्ली-तुये जलमार्गालाच अधिक पसंती असते. या जलमार्गावरील वेळापत्रकानुसार जलप्रवास करणारी नियमित फेरीबोटसेवा वेळेच्या मागेपुढे होण्याने प्रवाशांना चुकल्यास वाहनचालक तसेच इतर प्रवासी विशेष फेरीबोट मागवून घेत असतात. त्यासाठी पूर्वीच्या दरानुसार त्यांना शंभर रुपये भरावे लागायचे. मात्र, गेल्या महिन्याभरात संबंधित नदी परिवहन खात्याकडून विशेष फेरीबोट सेवेच्या दरात अचानक वाढ करून दोनशे पन्नास रुपये केली आहे. या दरवाढीमुळे आधीच टाळेबंदीमुळे जर्जर झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागली आहे.

संबंधित बातम्या