राज्यात कोरोनाचे आणखी ५ बळी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

राज्यात आज कोरोनाच्या आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवर मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५९७ वर पोहोचली आहे.

पणजी : राज्यात आज कोरोनाच्या आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवर मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५९७ वर पोहोचली आहे. आज राज्यभरात २३३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले तर १९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात दोन हजार चारशे छत्तीस इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. 

आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये आल्तिनो येथील ५८ वर्षोय पुरुष, करूर कर्नाटक येथील ५५ वर्षीय महिला, फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ६० वर्षीय पुरुष आणि साखळी येथील ७९ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आज झालेले पाचही मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे झाले आहेत.  दरम्यान राज्याचा रिकव्हरी रेट ९२.९७ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. आज ८३ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग स्वीकारला तर ५२ लोकांनी इस्पितळात भरती होणे पसंत केले. राज्यात आजवर अकरा हजार पाचशे सत्तर लोकांनी इस्पितळात उपचार घेतले आहेत.

गेल्या चोवीस तासात १ हजार ६८३  इतक्या संशयितांच्‍या लाळेच्या नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. उत्तर गोव्यात खाटांची संख्या ४६९ इतकी असून सध्या ३७४ खाट वापरात आहेत तर दक्षिण गोव्यात ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ५९९ खाट वापरात आहेत. दरम्यान, डिचोली आरोग्य केंद्रात ७७, साखळी आरोग्य केंद्रात ८६, पणजी आरोग्य केंद्रात ११६, म्हापसा आरोग्य केंद्रात ९८,चिंबल आरोग्य केंद्रात १२८, पर्वरी आरोग्य केंद्रात १३१, मडगाव आरोग्य केंद्रात २१८, कुडतरी आरोग्य केंद्रात ८१, फोंडा आरोग्य केंद्रात १५४ इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या