रितेश, रॉय नाईक यांचा भाजप प्रवेश

roy & Ritesh Naik
roy & Ritesh Naik

अवित बगळे
पणजी :

फोंड्याचे आमदार रवी नाईक (काँग्रेस) यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे केंद्रातील व राज्यातील सरकार जनतेचे प्रश्न उत्कृष्टपणे हाताळत असल्याने भाजपचे संघटनात्मक काम करण्यासाठी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केल्याचे रितेश यांनी या प्रवेशानंतर विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
रॉय यांच्यावर अमलीपदार्थ लागेबांधे प्रकरणात आरोप केल्यावरही त्यांना प्रवेश कसा दिला, असे विचारल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रॉय रवी नाईक यांच्यावर भाजपने यासंदर्भात कधीही आरोप केले नव्हते, असे सांगत या विषयाला पूर्णविराम दिला. रॉय नावाची आणखी व्यक्ती असू शकत नाही का? अशी विचारणा करण्यासही ते विसरले नाहीत.

भाजपच्या येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत या दोघांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी गोवा बहुजन महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, माजीमंत्री रमेश तवडकर, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सरचिटणीस दामोदर नाईक आणि खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. तानावडे यांनी सदस्यत्त्‍वाची पावती, श्रीपाद नाईक यांनी पुष्पगुच्छ तर तेंडुलकर यांनी भाजपचा शेला घालून या दोघांचे स्वागत केले.
तानावडे म्हणाले, भाजपमध्ये केवळ राज्यातच नव्हे देश पातळीवरही अनेक नेते येण्यास इच्छूक आहेत. भाजपने राज्यात संघटनात्मक बांधणी केली आणि जनतेशी थेट संवाद निर्माण केला आहे. हेच काम या दोन्ही युवा नेत्यांनी पुढे न्यावे. त्यांना भाजप प्रवेशासाठी कसलेही आमिष दाखवण्यात आलेले नाही. ते काम करत करतच पुढे जाणार आहेत.
श्रीपाद नाईक म्हणाले, ८० च्या दशकात भाजपचे काम सुरू केले, तेव्हा आणखीन पक्ष कशाला असे लोक विचारत असत. जनकल्याणासाठी भाजप हे आता लोकांना पटले आहे. भाजपला जनतेने सुरवातीच्या १० वर्षानंतर भरभरुन पाठिंबा देणे सुरू केले आहे. युवा नेते भाजपमध्ये येत आहेत हे सुचिन्ह आहे. चांगल्या विचारांनी केलेले राजकारण हे समाजकारणासाठी पूरक असते हे भाजपने सिद्ध केले आहे.
रितेश यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जनकल्याणाचे उत्कृष्‍ट काम करत आहेत. फोंड्याच्या आमदारांना सरकारचे सहकार्य लाभते की नाही याविषयी तेच सांगू शकतील. आम्ही भाजप प्रवेशाविषयी कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली होती. आमचा भाजप प्रवेश हा निवडणुकीवर डोळा ठेऊन केलेला प्रवेश नाही. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत पुढे जाणार आहोत.

 

संपादन : महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com