रितेश, रॉय भाजपात जाणार?

Avit bagale
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश व रॉय हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे स्पष्ट सांगण्यास नाईक यांनी आज नकार दिला. त्यांनी आपल्या मुलांनाच तुम्ही काय ते विचारा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे फोंड्यासह प्रियोळ, मडकई मतदारसंघासाठी भाजप वेगळी खेळी आकाराला आणत असल्याचा संशय बळावला आहे.

अवित बगळे, नरेंद्र तारी

पणजी, फोंडा :

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश व रॉय हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे स्पष्ट सांगण्यास नाईक यांनी आज नकार दिला. त्यांनी आपल्या मुलांनाच तुम्ही काय ते विचारा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे फोंड्यासह प्रियोळ, मडकई मतदारसंघासाठी भाजप वेगळी खेळी आकाराला आणत असल्याचा संशय बळावला आहे.
विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष राहिले असले, तरी कधीही ही निवडणूक होऊ शकते असे वातावरण आहे. त्यामुळे सर्वचजण तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये रितेश नाईक आणि रॉय नाईक हे प्रवेश करणार, असा संदेश समाज माध्यमांवर आज फिरू लागला आहे. त्याबाबत आमदार रवी नाईक यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत याचा इन्कार केला नाही. फोंडा पालिका निवडणूक जवळ आली असताना आकाराला येणाऱ्या या राजकीय समीकरणाचा दूरगामी परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार आहे.
व्हॉटस्‌ॲप तसेच इतर प्रसार माध्यमातून याबाबतची उलटसुलट माहिती फिरत असल्याने फोंड्याबरोबरच राज्यातील काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले असून कदाचित हा ‘हाय लेव्हल’ निर्णय असू शकतो, अशी कुजबूज मात्र व्यक्त होताना दिसली. खुद्द रवी नाईक यांनी आपण काँग्रेसमध्येच आहे, काय विचारायचे ते रितेश आणि रॉयला विचारा, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांचे मोबाईल बंद होते.
राज्याची विधानसभा निवडणूक दीड दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कदाचित पुढील धोरण निश्‍चितीसाठी भाजपकडून ज्या प्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्‍थानात काँग्रेस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला, तसाच गोव्याच्याबाबतीतही होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. केंद्रात भाजपची सत्ता आहे, आत्ता कुठे एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जरी काँग्रेसला चांगले मतदान झाले तरी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचा वरचष्मा गोव्याच्या राजकारणावर राहील, आणि काँग्रेसला सरकार चालवणे मुश्‍किलीचे ठरू शकते. त्यातच ज्याप्रमाणे काँग्रेसचे दहा आणि मगोचे दोन आमदार फुटून भाजपमध्ये सामील झाले, तसा प्रकारही होऊ शकतो, असेही मत काहीजणांकडून व्यक्त होत आहे.

...म्‍हणून भाजपला हवे ‘दोन मोहरे’!
माजी मुख्‍यमंत्री व आमदार रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक हे फोंडा पालिकेचे नगरसेवक आहेत. या पालिकेत मगो, भाजप आणि मगो अशा तिन्ही राजकीय पक्षांचे समर्थक नगरसेवक निवडून आले आहेत. सुरवातीला पालिकेवर मगोची सत्ता होती, पण आता सूत्रे भाजपकडे आली आहेत. त्यातच सत्तांतरासाठी मागेही मोठ्या हालचाली झाल्या होत्या, त्या पार्श्‍वभूमीवर रितेश नाईक यांना नगराध्यक्षपदाची ऑफरही येऊ शकते.
रॉय नाईक यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. फोंडा पालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी दाखल केली होती, मात्र अटीतटीचा सामना झाल्याने रॉय नाईक निवडून येऊ शकले नव्हते. तरीपण जनसंपर्क आणि राजकीय नेत्यांशी चांगले संबंध यामुळेही भाजपला रॉय आणि रितेश हे दोन्ही मोहरे पुढील काळात उपयुक्त ठरू शकतात, असाही होरा व्यक्त करण्यात येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आणि रवी नाईक यांचे चांगले संबंध असल्यानेही अशाप्रकारची ऑफर असू शकते.
आमदार रवी नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. आपण काँग्रेसचे आमदार असून जे काही विचारायचे ते रितेश आणि रॉयला विचारा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यात सध्या सत्तरीत पिता काँग्रेसमध्ये तर पुत्र भाजपमध्ये आहे. प्रतापसिंह राणे काँग्रेसचे आमदार तर विश्‍वजित राणे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे एकाच घरात राहून दोन राजकीय पक्षांशी बांधिलकी असण्याचा प्रकार गोव्यात काही नवीन नाही. नेमके तेच सूत्र फोंड्यातही लागू होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर रवी नाईक यांनी चक्क आपण काँग्रेसचा आमदार असल्याचे स्पष्ट केल्याने रॉय आणि रितेशच्याबाबतीत भाजपची नेमकी भूमिका काय हे दोन दिवसांनीच कळेल.

फोंड्यात भाजप नेत्यांनी केले हात वर!
फोंड्यात काही भाजप नेत्यांशी संपर्क साधला असता, आपल्याला यातील काहीच माहिती नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केले. गेल्या निवडणुकीत भाजप तिकिटावर निवडणूक लढवलेले फोंड्यातील भाजप नेते सुनील देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. शेवटी हे राजकारण..., असेही सुनील देसाई म्हणाले. फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनीही काहीच माहिती नसल्याचे सांगून असे झाले तर राजकीय समीकरणेच बदलणार असल्याचे सांगितले.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या