टाळेबंदीमुळे रस्ता अपघातात ३० टक्के घट 

road accident
road accident

पणजी

यावर्षी राज्यात कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी लागू झाल्यामुळे रस्ता अपघातांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० टक्के घट झाली. यावर्षी जूनअखेरपर्यंत १२४९ अपघातांची नोंद झाली आहे, तर ११७ जणांचा मृत्यू झाला. याच काळात गेल्यावर्षी ही संख्या १७९३ होती व १६१ जणांचा बळी गेला होता. या टाळेबंदीच्या काळात रस्त्यावर अत्यावश्‍यक सेवा वगळल्यास इतर वाहनांना बंदी लागू होती. त्यामुळे हा फरक झाला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर यांनी दिली. 
केंद्राने मार्चमध्ये एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला व लगेच टाळेबंदीची घोषणा केल्यानंतर गोव्यातही त्याची अंमलबजाणी झाली. त्यामुळे रस्त्यावर प्रवासी वाहतूक तसेच वैयक्तिक वाहने चालविण्यास बंदी घालण्यात आली. अत्यावश्‍यक सेवेतील वाहन वगळता इतर सर्व वाहने मे महिन्यात टाळेबंदी उठवेपर्यंत बंद ठेवली गेली. त्यामुळे एक महिन्यात एका दुचाकीचा स्वयंअपघात झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. 
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यावर्षी झालेल्या १२४९ रस्ता अपघातात ११२ भीषण अपघात झाले. त्यात ७५ गंभीर, २४० किरकोळ, तर ८२२ कोणतीही इजा न झालेल्या अपघातांची नोंद झाली. भीषण अपघातात ११७ जणांचा मृत्यू झाला, तर ११५ जण किरकोळ जखमी झाले. या एकूण मृत्यू झालेल्या ११७ पैकी ८४ जण दुचाकीस्वार आहेत. त्यामध्ये ७७ दुचाकीचालक, तर ७ सहचालक यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ७ चालक तसेच २० पादचारी वाहनांच्या धडकेने मृत्युमुखी झाले आहेत. 
राज्यातील टाळेबंदी उठविल्यानंतर पुन्हा रस्त्यावरील वाहनांची वर्दळ सुरू झाली असली, तरी रस्ता अपघाताचे प्रमाण कमी आहे. काही 
मार्गावर पूर्णपणे प्रवासी बसगाड्या धावत नाहीत. तसेच अंतर्गत रस्त्यांवरील काही अवघ्याच बसगाड्या धावत आहेत. कदंबच्या फक्त 
१७८ बसगाड्या धावत आहेत, तर राज्यात असलेल्या सुमारे १४५० खासगी प्रवासी बसगाड्यांपैकी साधारण दोनशेच्या आसपासच बसगाड्या धावत आहेत. खाण व्यवसाय बंद असल्याने तसेच पावसाळ्यात खनिजवाहू ट्रकांचीही वाहतूक बंद आहे. अनेक कंपन्या बंद आहेत. त्यामुळे राज्यात कंपन्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांचीही संख्या घटली आहे. महामार्गावरील मालवाहू तसेच प्रवासी बसगाड्यांची वर्दळ कमी झाल्याने तसेच पर्यटन व्यवसायही बंद असल्याने रस्ता अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. 
या वर्षीच्या तुलनेत गेल्यावर्षी (२०१९) याच सहामाहीच्या काळात १७९३ रस्ता अपघातांची नोंद झाली होती. त्यामध्ये १४९ भीषण अपघात, ९८ गंभीर अपघात तसेच ३९१ किरकोळ अपघात झाले होते. मात्र, मृत्यू झालेल्यांची संख्या १६१, गंभीर दुखापतींची संख्या 
१४२, तर किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ६०० होती. २३ पादचाऱ्यांचा वाहनांनी धडक दिल्याने मृत्यू झाला होता, तर ३ चालक अपघातात ठार झाले होते. गेल्यावर्षी राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू होता, तसेच वाहनांची वाहतूक सुरळीत होती. 
राज्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती असूनही रस्ता अपघातात गेल्या सहा महिन्यांत ७७ दुचाकीस्वार, तर ७ सहचालक ठार झाले आहेत. शहरामध्ये पोलिसांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक हेल्मेट घालत असले, तरी महामार्गावर ते हेल्मेट काढून हातामध्ये किंवा वाहनाला अडकवून प्रवास करतात. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हे हेल्मेट आहे याची जागृती अजूनही तरुण पिढीमध्ये निर्माण झालेली नाही. राज्यात गेल्या महिन्यात पोलिस महासंचालकपदाचा ताबा घेतलेले मुकेश कुमार मीणा यांनी रस्ता अपघात नियंत्रणात आणण्यासाठी व सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल असे सांगितले आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com