"अर्धवट अवस्थेची चौकशी सरकार करणार का?"

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

३२ कोटी रुपये खर्चून बायणा ते सडा-बोगदा पर्यंत गेल्या सहा वर्षांपासून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण होत नसल्याने मुरगावधील जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

मुरगाव : ३२ कोटी रुपये खर्चून बायणा ते सडा-बोगदा पर्यंत गेल्या सहा वर्षांपासून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण होत नसल्याने मुरगावधील जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ह्या रस्त्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत का ठेवले आहे  याची चौकशी सरकार करणार का? असा जनतेचा सवाल आहे. 

 बायणा ते सडा - बोगदा पर्यंतचा सुमारे ९ किलोमीटर लांबीचा २०१४ पासून गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून बांधण्यात येणारा रस्ता अद्याप बांधून पूर्ण होत नाही यामागे मोठा गोलमाल असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.या रस्त्याचे कासवगतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम चालले आहे असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.मुरगाव बंदरातील वाहतूकीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील रस्ता लवकरात लवकर बांधून पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

   दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बायणा ते सडा - बोगदा पर्यतच्या ९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ ता.२६ ऑक्टोबर २०१४ रोजी सडा येथे मोठ्या समारंभपूर्वक करण्यात आला होता.३२ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे बगीचे, रस्ता रुंदीकरण,बस थांबे बांधण्याचे आराखड्यात नमुद करण्यात आले होते.दिड वर्षात हा महत्त्वपूर्ण रस्ता बांधला जाईल अशीही घोषणा करण्यात आली होती पण,सहा वर्षे उलटत आली तरी रस्त्याचे २५ टक्के सुद्धा काम पूर्ण झाले नाही.

  जेटी येथे रेडकर हाऊस समोर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे.त्यासाठी एका बाजूने काॅंक्रीटची भलीमोठी संरक्षक भिंत उभारुन रुंदीकरण केले जात आहे.पण त्यासाठी दगड मातीचा भराव न घालता कचरा घातला जात आहे.त्यामुळे भविष्यात रस्ता खचण्याची भीती आहे.याप्रकरणी सडा येथील जागृत नागरिक शंकर पोळजी यांनी आवाज उठविला आहे.दगड मातीचा भराव घालण्याऐवजी टाकावू कचरा टाकून कंत्राटदार फसवणूक करीत असल्याचा आरोप श्री.पोळजी यांनी केला आहे.

   दरम्यान,बायणा येथून ते राजेश्वरी बंगल्यापर्यंत एमपीटीच्या कुंपणाला लागून गटार बांधून चार वर्षे झाली आहे.पण रस्त्याचे काम केलेले नाही.या काॅंक्रीटच्या गटारावरील लोखंडी सळ्या तशाच ठेवल्याने घातक बनल्या आहेत.बोगदा पासून ते सडा मार्केट प्रकल्पापर्यंतही काॅंक्रीटचे गटार बांधलेले आहेत.त्याच्या वरच्या सळ्या धोकादायक बनल्या आहेत.गेल्या वर्षी एका मोटरसायकल स्वाराच्या पायामधून आरपार ह्या सळ्या गेल्या होत्या.

 

 गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने बायणा ते सडा - बोगदा पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यासाठी या प्रकल्पावर ३२ कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे.पण कंत्राटदाराने गेल्या सहा वर्षांच्या काळात जेमतेम २५ टक्केच काम पूर्ण केले असून त्यामुळे उर्वरित शिल्लक काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे एक कोडे बनले आहे.स्थानिक आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांनाही या कामाचे काहीच पडून गेलेले नाही असे दिसून येते.

संबंधित बातम्या