"पुढील वर्षात रस्ता अपघात मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य": केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पुढील वर्षात रस्ता अपघात मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. रस्त्यावरील भटक्या गुरांच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री व रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी बैठकीनंतर दिली. 

पणजी : राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे रस्तावरील खड्डे तसेच रस्ता अभियांत्रिकीकरण व कायद्याची अंमलबजावणी जबाबदार आहे. पुढील वर्षात रस्ता अपघात मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. रस्त्यावरील भटक्या गुरांच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री व रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी बैठकीनंतर दिली. 

पणजीतील पर्यटन भवनमध्ये पुनर्स्थापना करण्यात आलेल्या समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीपाद नाईक होते. यावेळी विविध खात्याचे अधिकारी तसेच गोवा कॅनचे या एनजीओचे प्रमुख रोलांड मार्टिन्स उपस्थित होते. रस्ता अपघात प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी त्याच्या संबंधित असलेल्या सर्व खात्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पुनर्स्थापित करण्यात आलेल्या समितीची आजची ही पहिलीच बैठक होती. अशाप्रकारच्या बैठका तीन महिन्यांनी घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. रस्ता अपघात होण्यामागील अनेक कारणे आहेत. पावसाळ्यात खड्डे रस्त्यावर पडल्यावर अपघात होतात. पावसात रस्ता धुऊन जातो त्यामुळे हेही एक कारण आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे खड्डे वेळीच दुरुस्त केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. मद्यपी चालकांवर
नियंत्रण आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

आजच्या झालेल्या बैठकीत रस्त्याच्या बाजूने लावण्यात येत असलेली मोठमोठे जाहिरातीचे फलक, राज्यातील वाहतूक व्यवस्था पद्धत यावर चर्चा होऊन त्यात सुधारणा करण्याच्या सूचना करण्या आल्या. या बैठकीला अबकारी, वाहतूक पोलिस, कदंब, समाज कल्याण खाते, एनजीओ आदी सदस्य उपस्थित होते. उत्तर गोवा जिल्हाधिकारी या या समितीच्या सदस्य सचिव आहेत. त्यामुळे या बैठकीत झालेल्या चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानंतर काय सुधारणा झाली याचा आधावा पुढील बैठकीत घेतला जाईल. 

या बैठकीला उपस्थित असलेले ‘गोवा कॅन’चे प्रमुख रोलांड मार्टिन्स म्हणाले की, मागील बैठकांमध्ये रस्ता अपघात कमी करण्यासाठी ज्या सूचना करण्यात आल्या होत्या त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे समितीच्या निदर्शनास आणून देण्यात आले. २०१९ मध्ये रस्ता अपघातात २९७ जणांचा मृत्यू झाला होता तर यावर्षी ऑक्टोबर २०२० पर्यं ही संख्या १७८ झाली आहे. रस्त्यांवरील भटक्या गुरांच्या समस्येचा प्रश्‍न पंचायतीच्या स्तरावर सोडविण्याबाबत चर्चा झाली. पंचायत व पालिका क्षेत्रातील रस्ता सुरक्षा समित्या पुनरुज्जीवित करण्याचे ठरले. पणजी कदंब बसस्थानकासंदर्भात जो अहवाल गोवा कॅनने पाठविला होता त्यानुसार आवश्‍यक सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत निर्णय झाला. राज्यातील बार व रेस्टॉरंट्समध्ये ‘मद्य घेऊन वाहन चालवू नका’ असे फलक लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या व अबकारी खात्याने त्यासाठी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले. 

राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक भेट देतात त्यामुळे पर्यटन खात्याने विविध कार्यक्रम हाती घेऊन पर्यंटकांना आकर्षित करावे. पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या वाहतुकीसंदर्भातची माहिती नसते त्यामुळे पर्यटकांचा गोंधळ उडतो. पर्यटन स्थळाकडे कोणत्या कदंब बसेस जातात याची माहिती या बसेसना क्रमांक देऊन देण्याबाबत सूचना करण्यात आली. केंद्राकडून पंचायतींना निधी येतो त्याचा वापर पंचायतीमधील रस्त्यांची डागडुजी करून रस्ता अपघात कमी करण्यावर भर द्यावा असे ठरविण्यात आले. रस्ता अपघात टाळण्यासाठी संबंधित खात्यांमध्ये समन्वय असल्यासच शक्य आहे त्यामुळे सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षेसाठी प्राधान्यक्रमाने काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या