बायणा-सडा पर्यंतचे रस्त्याचे काम रखडले

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

३२ कोटी रुपये खर्च करून बायणा ते सडा-बोगदा या दरम्यान रस्ता निर्माण करण्यात येत आहे. हे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू असल्याने सद्यःस्थितीत हे काम रखडले आहे.

मुरगाव: ३२ कोटी रुपये खर्च करून बायणा ते सडा-बोगदा या दरम्यान रस्ता निर्माण करण्यात येत आहे. हे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू असल्याने सद्यःस्थितीत हे काम रखडले आहे. त्यामुळे नेमके कोणत्या कारणामुळे हा काम रखडले याबाबत लोक संभ्रमात असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी मुरगावतील जनतेने केली आहे.

बायणा ते सडा-बोगदा पर्यंतचा सुमारे ९ किलोमीटर लांबीचा २०१४ पासून गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून बांधण्यात येणारा रस्ता अद्याप बांधून पूर्ण होत नाही. या रस्त्याचे काम कासवगतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम चालले आहे. मुरगाव बंदरातील वाहतुकीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील रस्ता लवकरात लवकर बांधून पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बायणा ते सडा-बोगदा पर्यंतच्या ९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा प्रारंभ २६ ऑक्टोबर २०१४ रोजी सडा येथे मोठ्या समारंभपूर्वक करण्यात आला होता. ३२ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे बगीचे, रस्ता रुंदीकरण, बस थांबे, बांधण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले होते. दीड वर्षात हा महत्त्वपूर्ण रस्ता बांधला जाईल, अशीही घोषणा करण्यात आली होती. पण, सहा वर्षे उलटूनही रस्त्याचे २५ टक्केही काम झालेले नाही.

जेटी येथे रेडकर हाऊस समोर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. त्यासाठी एका बाजूने कॉंक्रीटची संरक्षक भिंत उभारुन रुंदीकरण केले जात आहे. पण, त्यासाठी दगड मातीचा भराव न घालता कचरा घातला जात आहे. त्यामुळे भविष्यात रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सडा नागरिक शंकर पोळजी यांनी सांगितले की, दगड व मातीचा भराव घालण्याऐवजी टाकाऊ कचरा टाकून कंत्राटदार फसवणूक करीत आहे. 

गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने बायणा ते सडा - बोगदा पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यासाठी या प्रकल्पावर ३२ कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. पण, कंत्राटदाराने गेल्या सहा वर्षांच्या काळात जेमतेम २५ टक्केच काम पूर्ण केले असून, उर्वरित शिल्लक काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे एक कोडे बनले आहे. 

संबंधित बातम्या