डॉलर्समध्ये व्यवहार करत गोवा टॅक्सी चालकांकडून परदेशी पर्यटकांची लूट 

दैनिक गोमंतक
बुधवार, 28 एप्रिल 2021

नेरुल येथील घटनेचा टुर्स अँड ट्रव्हल्स असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) व लाईन प्रॉड्युसर्सने टॅक्सीमालक संघटनेवर लूटमार व नक्षलवादी असे संबोधून केलेल्या आरोपांचा निषेध करत आहे.

पणजी :  नेरुल येथील घटनेचा टुर्स अँड ट्रव्हल्स असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) व लाईन प्रॉड्युसर्सने टॅक्सीमालक संघटनेवर लूटमार व नक्षलवादी असे संबोधून केलेल्या आरोपांचा निषेध करत आहे. राज्यात हॉटेल उद्योगात असलेल्या 'टीटीएजी' परदेशी पर्यटकांकडून डॉलरने व्यवहार करून लूट करत असल्याचा पलटवार संघटनेने आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. (Robbery of foreign tourists by Goa taxi drivers trading in dollars) 

‘गोमेकॉ’ हॉस्पीटलमध्ये 1 कोटी 40 लाख लिटर्स ऑक्सिजन प्रतिदिन वापरला जातो

संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर म्हणाले की, राज्यात सरकारने 144  कलम लागू असल्याने टॅक्सी मालकांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, नेरूल येथे चित्रीकरणासाठी परवानगी कोणी दिली याची माहिती मिळवण्यासाठी संघटनेचे काही नेते तेथे गेले होते. तसेच तेथे महाराष्ट्रातील टॅक्सी उभ्या होत्या. यासंदर्भात विचारणा केली असता या चित्रीकरणातील काहींनी हल्ला केला त्यामध्ये एक टॅक्सी चालक जखमी झाला. त्यामुळे यासंदर्भातची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकात देण्यात आली होती. त्यानंतर लाईन प्रॉड्युसर्सने दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई करत मला व सुनील नाईक या दोघाना अटक केली. आमच्या तक्रारीची दखल न घेताच पोलिसांनी उलट आमच्यावरच कारवाई केली. हा प्रकार म्हणजे शांतपणे आंदोलन करत असलेल्या टॅक्सी चालकांवरील अन्याय आहे.

गोव्यातील 13 दवाखाने बंद; साडेतीन लाख कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार

राज्यात कोरोनाचे संकट असताना 30 ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने लाईन प्रॉड्युसर्स गोव्यात आले आहेत. या चित्रीकरणाच्या ठिकाणी सुमारे 200  लोक असतात अशावेळी कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होत नाही का असा प्रश्‍न सुनील नाईक यांनी केला. आम्ही पोलिस स्थानकात असताना नेरूल येथे वाहनांची तोडफोड केल्याचा गुन्हा आमच्यावर दाखल केला गेला. सरकारने 144  कलम सर्वांनाच समान लागू करा. राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज आहे. लॉकडाऊन केल्यास अर्थव्यवस्था ढासळेल असे मुख्यमंत्री सांगत आहेत पण जर लोकच जिवंत राहिले नाही तर अर्थव्यवस्था राहील का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. टॅक्सींना मीटर बसविण्यास मालकांची तयारी आहे, पण टॅक्सींना मीटर बसविण्यासंदर्भात सरकारकडे कृती नियोजन नाही. आम्ही कधीच मीटर बसविण्यास विरोध केला नाही मात्र सरकारने सुधारित भाडे दरपत्रक तसेच मीटर दुरुस्ती केंद्रे अगोदर स्थापन करावी अशी अट घातली होती ती अजूनही ते पूर्ण करू शकलेले नाही. ‘टीटीएजी’ नेहमीच मीटरचा प्रश्‍न उपस्थित करत आहे पण ते स्वतःच भ्रष्टाचारी आहेत. उद्योग व्यवसायात त्यांनी गोमंतकियांना रोजगार उपलब्ध करण्याऐवजी या व्यवसायात परप्रांतियांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. टीटीएजी व लाईन प्रॉड्युसर्सना मार्गदर्शक तत्‍वे लागू करून सध्या सुरू असलेले चित्रीकरण बंद करण्याची मागणी केली आहे, असे चेतन कामत म्हणाले. 

तोडग्याबाबत सरकारवर विश्‍वास
राज्यात टॅक्सीमालकांच्या आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. हा एकच पारंपरिक व्यवसाय गोमंतकियांच्या हातात आहे त्यामुळे मुख्यमंत्री व वाहतूकमंत्री त्यावर तोडगा काढतील यावर संघटनेचा विश्‍वास आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची गरज वाटत नाही. वाहतूकमंत्र्यांनी स्वतःच हा अप आधारित टॅक्सी सेवा गोव्यासाठी व्यवहार्य नाही असे स्पष्ट केले आहे. टॅक्सी चालकांनी मीटर बसविण्यास नकार दिल्याने राज्यात गोवा माईल्स ॲप टॅक्सी सेवा आली असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर सांगत आहेत तर त्यांनी असे कोणी सांगितले होते ते त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी संघटनेने केली.  

...तर टॅक्सीचालकाची हकालपट्टी
टॅक्सींना मीटर बसविल्यानंतर तसेच सरकारने सुधारीत भाडे दरपत्रक जारी केल्यावरही जर टॅक्सीचालकांनी पर्यटकांकडून जादा भाडे आकारल्यास त्याची तक्रार करण्यासाठी सरकारने हेल्पलाईन सेवा सुरू करावी. जर हे सिद्ध झाले तर टॅक्सीचालकाला संघटनेमधूनच हकालपट्टी केली जाईल. सरकारही त्याच्याविरुद्ध जी कारवाई करील त्यामध्ये हस्तक्षेप न करता उलट पाठिंबा देईल असे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या