स्वप्नील वाळके यांचा खून चोरीच्या इराद्यानेच; पोलिस महासंचालकांची माहिती

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

संशयितांचा स्वप्नील वाळके यांच्याकडे यापूर्वी काहीही संबंध नसल्याचे तापसकामात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी आज दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली.

सासष्टी: मडगाव शहरात भरदिवसा सराफी स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांनी चोरी करण्यापूर्वी मडगावातील अनेक दुकांनांची सर्व्हे करून स्वप्नील यांच्या दुकानात चोरी करण्याचा निर्णय घेतला होता. चोरी करण्याच्या इराद्यानेच हा गुन्हा झाल्याचे आतापर्यंतच्या सखोल तपासात निष्पन्न झाले आहे. 

संशयितांचा स्वप्नील वाळके यांच्याकडे यापूर्वी काहीही संबंध नसल्याचे तापसकामात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी आज दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दक्षिण गोव्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक महेश गावकर उपस्थित होते. या खूनप्रकरणी मुस्तफा शेख, ओमकार पाटील आणि एव्हेंडर रॉड्रीगिस या तीन संशयितांना अटक केली.  या खुनामागे अन्य व्यक्तीही गुंतलेली असल्यास त्याचा शोध घेण्यात येईल.

त्‍या दिवशी नेमके काय घडले!
स्वप्नील वाळके यांच्या दुकानात चोरी करण्यासाठी मुस्तफा हा एकटाच गेला होता. त्याचे साथीदार ओमकार व एव्हेंडर दुकानाबाहेर थांबले होते. मुस्तफा याने दुकानात प्रवेश केल्यावर पिस्तूल काढून स्वप्नीलवर रोखले. पिस्तूल दाखवल्यावर स्पप्नील बाजूला होतील व आपल्यास चोरी करायला मिळेल असे त्याला वाटले होते. पण, स्वप्नील यांनी धाडस दाखवून विरोध केल्यावर दोघांमध्ये झटापट झाली व मुस्तफाने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी लागली तरी स्वप्नील याने मुस्तफाला पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे संशयितांनी चोरी न करता तेथून पळ काढला. दुसरा संशयीत त्याचवेळी आत येत होता. त्याने स्वप्नीलला आपण वाचवत असल्याचे भासवले. पण, खरेतर तो हल्ला करणाऱ्याला पलायन करण्यास मदत करत होता, असे मीणा यांनी सांगितले. संशयिताने दुकानात प्रवेश केल्यानंतर थेट गोळी झाडली नाही. त्याने आधी केवळ पिस्तूल रोखले, असे मीणा यांनी स्पष्ट केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या