जुने गोवे चर्च कार्यालयात चोरी; हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह राहिले उभे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

जगभरात प्रसिद्ध असलेल्या जुने गोवे चर्च कार्यालयाच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व सुमारे ५५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक डीव्हीआर लंपास केला. हा चोरीचा प्रकार सकाळी चर्चचे धर्मगुरू यांनी उघडकीस आणला.

पणजी: जगभरात प्रसिद्ध असलेल्या जुने गोवे चर्च कार्यालयाच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व सुमारे ५५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक डीव्हीआर लंपास केला. हा चोरीचा प्रकार सकाळी चर्चचे धर्मगुरू यांनी उघडकीस आणला. हे चर्च जुने गोवे पोलिस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असूनही ही चोरी झाल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहेत. 

जुने गोवे येथील से केथड्रल चर्चचे धर्मगुरू आल्फ्रेड वाझ यांनी जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक तपास करताना श्‍वान पथकाचा वापर चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी करण्यात आला मात्र त्यात पोलिसांना काहीच धागेदोरे सापडले नाहीत. या चोरीमुळे जुने गोवे येथील दोन्ही चर्चच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी काल रात्री ८ ते आज सकाळी साडेपाचच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास झाली आहे. कार्यालयातील सामान अस्तावस्त पडले होते व पैशांच्या शोध घेण्यासाठी चोरट्यांनी तेथील टेबलाचे ड्रॉवर्स तोडले व त्यातील रक्कम जप्त केले. डीव्हीआर हा कार्यालयातच ठेवण्यात
आला होता तो सुद्धा चोरट्यांनी जाताना घेऊन गेले. ही चोरी चोरट्यांनी पूर्वनियोजितपणे केली असण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी खिडकीचे लोखंडी गज तोडून आत प्रवेश केला तो भाग दिसत नाही. ठसे तज्ज्ञांमार्फत कार्यालयातील वस्तूंवरील हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. श्‍वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा मागोवा पोलिसांनी घेण्याचा प्रयत्न मात्र त्यात पोलिसांना फारसे यश आले नाही.

सध्या पर्यटन मोसम सुरू असल्याने या चर्चला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या चर्चच्या आवारात पूर्वी खासगी सुरक्षा व्यवस्था होती मात्र सध्या ती काढण्यात आली आहे. त्याचा फायदा उठवून चोरट्यांनी ही चोरी केली असल्याचा निष्कर्ष उपस्थित लोकांनी काढला. काल रविवार असल्याने चर्चचे कार्यालय बंद होते. कार्यालय असलेल्या परिसरात दिव्यांचा लखलखाट आहे मात्र तरीही चोरट्यांनी ही चोरी केल्याने या परिसरातील व्यापारी वर्गामध्ये चर्चा होती. ३ डिसेंबरला या चर्चचे फेस्त असल्याने नोव्हेंबरच्या अखेरीस या चर्चमध्ये प्रार्थनेला (नोव्हेना) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ही चोरी झाल्याने कार्यालयात तसेच तेथे राहत असलेल्या धर्मगुरुरमध्ये भितीचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या