जिल्हा इस्पितळाच्या वापरासंदर्भात श्‍वेतपत्रिका काढून भूमिका स्पष्ट करावी: आमदार विजय सरदेसाई

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

कोविड महामारीमुळे लोकांना सध्या तातडीने उपचाराची गरज आहे त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी तत्परतेने निर्णय घ्यावा असे पत्रात म्हटले आहे. 

पणजी: राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारी व खासगी इस्पितळातील कोरोनाग्रस्तांसाठी असलेली जागा अपुरी पडत आहे. या इस्पितळाचा खासगीकरणासाठी वापर करण्यास दिले जाणार नाही. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या वापरासंदर्भातची भूमिका २४ तासांत श्‍वेतपत्रिका काढून स्पष्ट करावी, असा इशारा आरोग्यमंत्र्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.  

या जिल्हा इस्पितळाच्या दोन मजल्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न असल्यानेच कोविड इस्पितळासाठी त्याचा वापर करण्यासाठी कोणतेच निर्णय घेतले जात नाही. या इस्पितळात सुमारे २५० खाटांचे कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी आवश्‍यक त्या साधनसुविधा

उपलब्ध सरकारने उपलब्ध कराव्यात. सालसेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहेत. मडगावातील ईएसआय कोविड इस्पितळात जागा नसल्याने कोविड रुग्णांसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अति महनीय तसेच आरोग्य संचालकांना खासगी इस्पितळात कोरोनासंदर्भात उपचार दिले जात आहेत मात्र सामान्य लोकांना इस्पितळात जागा मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. कोविड महामारीमुळे लोकांना सध्या तातडीने उपचाराची गरज आहे त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी तत्परतेने निर्णय घ्यावा असे पत्रात म्हटले आहे. 

जिल्हा इस्पितळ दक्षिणेतील लोकांसाठी चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात ही दूरदृष्टी ठेवूनच नियोजन करण्यात आल्याने त्याचा वापर खासगीकरणासाठी करण्यास दक्षिणेतील जनता देणार नाही. सरकारच्या सार्वजनिक जागा तसेच साधनसुविधा या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या इस्पितळाच्या खासगीकरणाला विरोध आहे. या इस्पितळासाठी लोकांनी त्याग केलेला आहे. जर सरकारने ते इस्पितळ खासगीकरण करण्याचा प्रयत्न झाल्यास दक्षिणेतील गोमंतकीय त्याला विरोध करण्यास तयार आहेत. इस्पितळातील दोन मजल्यांची जागा रिक्त आहे त्यामुळे या जागेचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार आहे याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे सरदेसाई म्हणाले.  

या इस्पितळामध्ये यापूर्वी नर्सिंग इस्पितळ सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली होती, तेव्हा येथील दक्षिणेतील लोकांनी त्याला विरोध केला होता व त्यावेळी मी सुद्धा त्यांना पाठिंबा देत विरोध केला होता. ८०० खाटांच्या या इस्पितळात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. फातोर्डा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने माझ्या मतदारांनी या इस्पितळासाठी जमिनींचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या त्यागाचा उपयोग दक्षिणेतील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी व्हावा यासाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे. या इस्पितळात कायमस्वरुपी नोकऱ्याही या मतदारसंघातील लोकांना उपलब्ध करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र सध्या राज्यात कोविड महामारीने थैमान घातल्याने या इस्पितळातील दोन मजल्यांचा वापर कोविड इस्पितळासाठी करून २५० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात. 

महाराष्ट्र सरकार रुग्णांसाठी मोठेमोठे तंबू बांधून कोविड सुविधा देण्याच प्रयत्न करत आहे तर सरकार कोरोनाग्रस्त रुग्णांची सोय करू शकत नसल्याने त्यांना गृह अलगीकरण्याचा सल्ला दिला जात आहे ही शरमेची बाब आहे. बिहारमधील आगामी निवडणुकीमुळे पंतप्रधान उपचार निधीतून दोन ५०० खाटांच्या इस्पितळासाठी सहकार्य केले जात आहे, तर ८०० खाट्यांच्या जिल्हा इस्पितळासाठी इतर साधनसुविधा तसेच उपकरणे उपलब्ध करण्यासाठी गोवा सरकारला ही मदत का मिळू शकत नाही, असा प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी केला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या