"भाजपला हद्दपार करण्यास सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज": आमदार दिपक केसरकर

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा हात धरून भारतीय जनता पक्षाने गोव्यात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनाच संपविण्याचे काम भाजपने केले. यावरून भाजपची निती काय हे उघड होते.

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा हात धरून भारतीय जनता पक्षाने गोव्यात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनाच संपविण्याचे काम भाजपने केले. यावरून भाजपची निती काय हे उघड होते. भाजपला हद्दपार करण्याचे व गोव्याची अस्मिता जपण्याचे काम गोव्यातील सर्व पक्षांनी एकत्रित मिळून करण्याची, प्रसंगी एकमेकांविरुद्धचा विरोध तसेच मतभेद विसरून एकत्र येत गोव्यामध्ये इतिहास घडवायला पाहिजे असे मत महाराष्ट्राचे शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. 

पणजीत शिवसेनेच्या गोवा राज्य मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‍घाटन आज झाले त्याप्रसंगी आमदार दिपक केसरकर हे उपस्थित होते. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार यांचे काँग्रेसच्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. जर त्यांनी पुढाकार घेतला सर्वकाही शक्य आहे व कठीण काहीच नाही. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर  आघाडी केली होती. पवार साहेबांचे गोव्याशी जवळचे नाते आहे त्यामुळे त्यात अडचणी येऊ शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही गोव्याबद्दल आपुलकी आहे. स्थानिक लोकांचे हित जपण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिली आहे. त्यामुळेच गोव्याशी असलेले नाते पुनरुज्जीवित केले जाईल, असेही ते यावेळी बोलले.

भाजपला हद्दपार करण्यासाठी स्थानिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. भाजप देशावर राज्य करत आहे. सत्ता मिळवण्यासाठी ते स्थानिक पक्षांना जोडीला घेतात व त्यांनाच संपविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात महाआघाडी स्थापन झाली तशीच जर गोव्यात झाल्यास चमत्कार घडू शकतो. गोमंतकियपण जपून भूमिपुत्रांना न्याय द्यायला हवा. स्थानिक पक्षांचे अस्तित्वच नष्ट झाले तर अस्मिता जपली जाणार नाही. पवार साहेबांना गोव्याबद्दल प्रेम आहे. ते जेव्हा गोव्यात येतात तेव्हा ते गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच स्थानिक पक्षांच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी नेहमीच संवाद साधतात. त्यामुळे त्यांनी जर गोव्यात भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्रित आणले तर गोव्यात स्थानिक पक्ष सत्तेवर येऊ शकतील असे आमदार केसरकर म्हणाले.

संबंधित बातम्या