Goa Politics| माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची भूमिका; खरी कुजबूज!

काँग्रेसच्या आठ आमदारांच्या भाजपमधील प्रवेशामुळे सध्या राज्यभर एकच चर्चा सुरू आहे.
 Manohar Parrikar
Manohar Parrikar Dainik Gomantak

पर्रीकरांची ‘सल’

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची भूमिका अनेकांना पटत असेल किंवा न पटणारीही असेल. तसे पाहिले तर पर्रीकर जे काही बोलायचे ते विचारपूर्वक असायचे. काँग्रेसच्या आठ आमदारांच्या भाजपमधील प्रवेशामुळे सध्या राज्यभर एकच चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापन झाली असताना आणि पक्षाकडे पुरेसे पाठबळ असतानाही काँग्रेसचे आठ आमदार फोडून घेण्याचे कारण काय, असा प्रश्‍न विचारला जातोय. दुसरीकडे समाजमाध्यमांतून मनोहर पर्रीकर यांच्या विविध चॅनलवरील मुलाखतींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीत कोणती गोष्ट खटकली, या प्रश्‍नावर पर्रीकर यांनी कामत यांनी भाजप सोडल्याची `सल’ अद्याप असल्याचे उत्तर पर्रीकरांनी दिले होते. कामत यांना सर्व काही देऊनही त्यांनी १७ वर्षांपूर्वी भाजप सोडला होता. आता ते परतल्याने पर्रीकरांना काय वाटत असेल, असाही प्रश्‍न नेटकरी विचारू लागले आहेत. ∙∙∙

(Role of former Chief Minister Manohar Parrikar)

देव जाणे!

राज्यात आतापर्यंत अनेक बाबतीत ओबीसींना त्यांचे न्याय्य हक्क डावलल्याची भावना ओबीसींच्या विविध बैठकांतून व्यक्त करण्यात आली आहे. आता तर काँग्रेसचे आठ आमदार भाजपवासी झाल्याने त्यांना काही ना काही आमिषेही दिली असणारच. या आठपैकी किमान दोघांना मंत्रिपदे शक्य आहेत. मात्र आता आहे त्या भाजपच्या मंत्र्यांना डच्चू दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कुणाला वगळणार, याची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत ओबीसी मंत्री आहेत. त्यातील एक ज्येष्ठ मंत्री असून या दोघांपैकी एकाला डावलण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी अर्थातच भंडारी समाजाने खबरदार, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे खारवी समाजाचा एकमेव प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे. त्यालाही वगळण्याची भाषा बोलली जात असल्याने आधीच अन्याय झाला असून आता आणखी नको, असा स्पष्ट इशाराच या समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता वगळणार कुणाला...! शेवटी दिगंबर कामतांच्या म्हणण्याप्रमाणे ‘देव जाणे!’ ∙∙∙

 Manohar Parrikar
‘दामोदर’साठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर; मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक

युरी, एल्टन ठरले हिरो!

राजकारण्यांनी आम जनतेला फसविले तर एकवेळ जनता सहन करेल. मात्र, जर राजकारण्यांनी देवाचाच विश्वासघात केला तर या राजकारण्यांना कोण आणि कसे माफ करणार? काँग्रेसशी गद्दारी करून, आम जनतेला फसवून व देवाचा विश्वासघात करून आठ आमदार भाजपमध्ये गेले. त्यांना समाज माध्यमांवर कसा ‘प्रसाद’ मिळत आहे हे आपण पाहातच आहोत. मात्र, या आठजणांच्या पापात सामील न झालेले कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता मात्र मतदारांसाठी हिरो ठरले आहेत. काँग्रेसचा हात न सोडल्याने हे दोघेही अभिनंदनास पात्र ठरले आहेत. युरी आणि एल्टन यांनी देवावर श्रद्धा ठेवून व आपल्या मतदारांच्या विश्वासाची कदर केली, त्याबद्दल दोघेही सन्मानास पात्र ठरले आहेत. त्यामुळे दोघांनाही चांगले राजकीय भवितव्य असल्याचे लोक बोलत आहेत. ∙∙∙

विश्वजीतचा पवित्रा

आठ काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने ‘खट्टू’ झाले आहेत ते छोटे खाशे म्हणजेच विश्वजीत राणे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आला, तेव्हा मुख्यमंत्री, निदान उपमुख्यमंत्रिपद तरी मिळावे म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले. अनेकवार दिल्ली वाऱ्याही केल्या; पण त्यांचा हेतू यशस्वी झाला नसला तरी त्यानिमित्ताने त्यांनी दिल्लीत जम मात्र बसविला होता. येनकेन प्रकारेण आज ना उद्या मुख्यमंत्री होणारच, या बेताने त्यांची एकेक पावले पडत होती. मात्र, आताच्या घडामोडींनी त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरल्यासारखे झाले आहे. पण या घडामोडींमुळे स्वस्थ बसले तर ते विश्वजीत कसले? त्यांचा पुढचा पवित्रा कोणता, हे ब्रह्मदेवालाही कळणार नाही, असे त्यांचे निकटचे स्नेही सांगत आहेत. आता बोला!∙∙∙

...आणि शुभेच्छा फलकावर फुलले ‘कमळ’ !

कुंभारजुवेत पुन्हा कमळ फुलले! त्यामुळे कालपर्यंत काँग्रेसच्या चिन्हासह राजेश फळदेसाई यांचे असलेले शुभेच्छा फलक गुरुवारी सकाळी कमळ चिन्हासह पुन्हा झळकले. जुने गोवे येथे बुधवारी भाजपचे सिद्धेश नाईक आणि पांडुरंग मडकईकर यांच्या कमळ चिन्हासह चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे फलक होते. मात्र, राजेश फळदेसाई यांनी भाजपमध्ये पक्षांतर करूनही बुधवारी फलकावर काँग्रेसचा हात कायम होता, हे कार्यकर्त्यांना खटकले. त्यामुळे गुरुवारी सकाळी पावसातही फलकावर ‘कमळ फुलले’. पण भाजप नेते सिद्धेश नाईक आणि पांडुरंग मडकईकर यांचे पुढे काय होणार? याबाबत मात्र चर्चेला रंग चढला आहे. त्यांचा पत्ता कायमचा तर कट केला गेला नाही ना, अशी चर्चा कुंभारजुवे मतदारसंघात सुरू झाली आहे. कारण पराभूत मडकईकर, उमेदवारी नाकारलेले जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीलाच राजेश फळदेसाई यांच्या भाजप प्रवेशामुळे लगाम बसला आहे. त्यामुळे दोघांचे दसरा-दिवाळीचे शुभेच्छा फलक कसे असतील? की तिघांचे एकत्र कमळासह फलक झळकतील, हे सांगणे सद्यस्थितीत कठीण आहे. ∙∙∙

 Manohar Parrikar
Bank Robbery : केरी बँक दरोडा प्रकरणातील तिघांना शिताफीने पकडले

आम्हीच सक्षम!

काँग्रेसमधून निवडून येऊन इतर पक्षात उड्या मारण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सर्रास सुरू आहे. या बेडूकउड्या मारण्यावर निर्बंध आणण्यात काँग्रेस नेतृत्व कमी पडत आहे. राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व तेवढे प्रबळ नाही, जे सर्वांना पक्षीय नीतिमत्तेच्या चौकटीत बांधून ठेवू शकेल. काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाण्याचा अवकाश, दुसरीकडे २०२७ च्या निवडणुकीत आम्ही सक्षम सरकार देण्यास प्रबळ आहोत, असे दावे सुरू झाले आहेत. त्यात तृणमूल, आप आणि आरजी यांचा समावेश आहे. राजकीय पक्ष असल्याने त्यांना दावे करण्याचा अधिकार आहे. आणखी पाच वर्षे आहेत आणि बरेच पाणी पुलाखालून आणि पुलावरूनही जायचे बाकी आहे. अगोदर पक्षाची मोट व्यवस्थित बांधण्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नाही तर काँग्रेस काय वाईट होता, अशी म्हणण्याची वेळ यायला नको, याचेही भान या पक्ष प्रवक्त्यांना ठेवावेच लागेल. ∙∙∙

दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक

राज्यात कोणतीही राजकीय उलथापालथ झाली की, संबंधित पक्षातील कोणताही नेता स्पष्टपणे आणि सत्य प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत नाही. ते देतानाही काही हातचे बाजूला राखून ठेवतातच. तर काही नेत्यांना असे वाटते की, प्रसार माध्यमांनी आमच्या मनातील भूमिका पुढे आणली पाहिजे. जे काही प्रकार घडतात, त्याची सर्व माहिती माध्यम प्रतिनिधींनाच माहीत असते. मग तुम्हीच सर्व काही जनतेसमोर आणावे ,असे त्यांना वाटणेही साहजिक आहे. परंतु रोखठोक भूमिका न घेणारे आणि ढेपाळलेल्या मन:स्थितीत असणारे नेते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचे काय होणार, याची त्यांनाही कल्पना कशी असेल? पक्षात किंवा सरकारात जे काय घडते, ते सर्व प्रसार माध्यमांनी पुढे आणावे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मात्र आम्ही आहोत, असे म्हणणे चुकीचे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे कितपत योग्य आहे?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com