काँग्रेस सरकारला घेरण्यात यशस्वी ठरणार का, याबद्दल शंकाच

काँग्रेस एकसंघ नसल्‍याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. निवडणुकीच्या पूर्वी देखील या पक्षात बरीच गटबाजी सुरू होती आणि आता देखील सुरूच आहे.
Goa Politics : Congress
Goa Politics : CongressDainik Gomantak

दुबळी काँग्रेस

काँग्रेस एकसंघ नसल्‍याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. निवडणुकीच्या पूर्वी देखील या पक्षात बरीच गटबाजी सुरू होती आणि आता देखील सुरूच आहे. नवीन प्रदेशाध्यक्षांनी ताबा घेऊनही त्यांच्यामागे पक्षाचे अनेक नेते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच काही आमदार आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि युवा फळीतील नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे आगामी राज्य विधानसभा अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सरकारला घेरण्यात यशस्वी ठरणार का, याबद्दल लोकांच्या मनात आताच शंका निर्माण झाली आहे. ∙∙∙

(role of the Congress in the politics of Goa)

Goa Politics : Congress
जाणून घ्या, आज राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर

मग सामान्यांचे काय?

बनावट दस्तऐवजाद्वारे जमीन हडपणाऱ्या टोळीचे एकेक कारनामे ऐकून भल्या भल्यांची मती गुंग झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. असे असतानाच म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी आपले नातेवाईक आणि मित्रपरिवारच या फसवणुकीला बळी ठरल्याचे सांगून हे कारस्थान किती भयंकर आहे, याची झलकच दाखवली आहे. ही माहिती देऊन ते थांबलेले नाहीत, तर जनतेनेही आपण या फसवणुकीचे बळी ठरलेलो नाही ना? याची तपासणी करावी, असे सावधतेचे आवाहनही केले आहे. लोकांनी शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन आपल्या जमिनीची माहिती घ्यावी. स्वत:च्या मालकीच्या जमिनी अजूनही आपल्याच नावावर आहेत की नाहीत, याची पाहणी करावी. सर्वांनी आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी करावी, असे जोशुआ यांनी नमूद केले आहे. त्यामुळे जिथे आमदारांच्या नातेवाईकांची फसवणूक होते, तेथे सामान्य जनतेचे काय हाल असतील, अशी पृच्छा करणाऱ्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत. ∙∙∙

काँग्रेसमधील समन्वय

सत्तास्थापनेची स्वप्ने पाहणारा काँग्रेस पक्ष गत निवडणुकीनंतर आणखीनच दुबळा झाला, तरीही त्यांचे नेते कोणताच बोध घेण्याच्या तयारीत नाहीत, अशी चर्चा आता जोर पकडू लागली आहे. आमदारांसाठी पणजीमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रात सहभागी होण्यावरूनही त्याचा प्रत्यय आला. कारण कोणतेही असो, त्यात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत या पक्षात मतैक्य दिसून आलेले नाही. अवघ्या 11 आमदारांमध्ये समन्वय असू नये, दोघे प्रथम उपस्थित राहातात आणि नंतर काढता पाय घेतात यातून लोकांमध्ये वेगळाच संदेश गेला, एवढे मात्र खरे. ∙∙∙

फूड ट्रकची समस्या

रस्ते, पदपथ व मोकळ्या जागांवरील अतिक्रमणाबाबत, विशेषतः गाड्यांसंदर्भात साधारणतः नव्वदच्या दशकात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर फार मोठी खळबळ माजली होती. कारण त्यानंतर झालेल्या कारवाईमुळे अनेक गाडेवाले देशोधडीला लागले होते. पण मुद्दा तो नाही. या हटविलेल्या जागीच नव्हे, तर विविध भागांत मोठ्या प्रमाणात फूड ट्रक उभे ठाकलेले दिसतात. त्यांच्यामुळे वाहतुकीत तर व्यत्यय तर येतोच; पण या व्यवसायावर कोणाचे नियंत्रण आहे का, असा प्रश्‍न पडतो. अन्न व औषध प्रशासनाने या ट्रकांची तपासणी करून त्यांना परवाने दिलेत का असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ∙∙∙

Goa Politics : Congress
बंडखोर आमदारांचा गुवाहाटीनंतर गोव्यात मुक्काम; संध्याकाळपर्यंत होणार दाखल

मडगावच्या बाबूंनाही सल

कुंकळ्ळीच्या क्लाफासबाबांना गत निवडणुकीत आपण निवडून येणार आणि मंत्री होऊन कुंकळ्ळीचा कायापालट करणार याची खात्री होती. म्हणून तर त्यांनी इतरांचे न ऐकता ती निवडणूक कमळ हाती घेऊन लढवली होती; पण काय झाले कोणास ठाऊक, त्यांच्या पदरी अपयश आले. पण त्यांना वाईट वाटते ते आपण हरल्याचे नाही, तर कुंकळ्ळीचा विकास रखडणार याचे. साधारण अशीच गत मडगावच्या बाबूंची म्हणजे आजगावकरांची झाली आहे. कारण त्यांनीही मडगावच्या कायापालटाची अशीच स्वप्ने रंगविली होती; पण ते हरले. आता ती स्वप्ने साकारणार नाहीत म्हणून ते खंत व्यक्त करत आहेत. ∙∙∙

चर्चा तर होणारच!

गोव्यातील केंद्रीय कार्यालयांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे यासाठी थेट केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच इशारा द्यावा लागला. खरे तर गेली कित्येक वर्षांपासून भाऊंचा आणि केंद्रातील भाजप सरकारचा संबंध आहे. ज्यावेळी त्यांनी स्थानिक युवकांना केंद्राशी संलग्नित कार्यालयांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या द्याव्यात असे म्हटले, तेव्हा भाजपचे अनेक कार्यकर्तेही आश्‍चर्यचकित झाले. राज्य सरकार हजारो नोकऱ्यांची घोषणा करते; पण त्या नोकऱ्या या ना त्या कारणाने कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. केंद्र सरकारशी संलग्नित कार्यालये गोव्यात काही पहिल्यांदाच आलेली नाहीत. उलट ती गोवा घटक राज्य झाल्यानंतर वाढली आहेत, हे भाऊंनाही नक्कीच माहीत असावे. पण अचानक भाऊंनी दिलेल्या इशाऱ्याविषयी चर्चा तर होणारच. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com