ज्युलियोचाही काटा काढण्याचा बेत फसला!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

घरच्या सुनबाई रोव्हीना लोबो यांच्याकडून स्वतःच्या नवऱ्याच्या सख्ख्या आत्यांचे (मार्था तसेच व्हेरा)  हत्यांकांड घडवून आणले गेले.

शिवोली:  रविवारी रात्री मार्ना शिवोलीत घडलेल्या दुहेरी हत्यांकांड प्रकरणाने सबंध गोवा खवळून निघाला. रविवारी रात्री डिनरच्या वेळी  घडलेल्या या  घटनेत घरच्या सुनबाई रोव्हीना लोबो यांच्याकडून स्वतःच्या नवऱ्याच्या सख्ख्या आत्यांचे (मार्था तसेच व्हेरा)  हत्यांकांड घडवून आणले गेले.  दरम्यान, हणजूण पोलिसांनी या निर्घृण हत्याकांडाचा तात्काळ मागोवा घेतांना संशयित रोव्हीना लोबो तसेच त्याचा सहकारी शोभन राज्याबली (हावेरी-कर्नाटक) यांच्या सहा तसात मुसक्या आवळून या खुनाचा छडा लावण्यात यश मिळविले. रोव्हीनाच्या मोठ्या अल्पवयीन मुलीची साक्ष याकामात महत्वाची ठरली.  २०१३साली मार्ना शिवोलीतील ज्युलियो लोबो यांच्याशी लग्नाची गाठ बांधलेल्या रोव्हीनाची सुरुवातीची तीन ते  चार वर्षे सुखासमाधानात गेली, परंतु  त्यानंतर स्कार्लेट बलात्कार प्रकरणात अडकलेले पती ज्युलियो लोबो तसेच त्यांचे दत्तक घेऊन  संगोपन केलेल्या मार्था तसेच व्हेरा लोबो यांंच्याशी मालमत्ता तसेच पैशांच्या वादातून बिनसल्याने घरांत भांडणे तंटे होणे नित्याचेच झाले होते.

अनेकदां हे वाद विकोपाला जात होते त्यामुळे त्यांची भांडणे पोलिसांपर्यत गेलेली होती. दरम्यान, घरगुती मामला असल्याने पोलिस अनेकदा त्यांना समज देत तात्पुरता दिलासा  देऊन घरी पाठवायचे. दरम्यान, रोव्हीनाच्या आईकडील लोकांनी रोव्हीना- ज्युलियो यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत खास रोव्हीना व त्यांच्या मुलांसाठी दांडा येथील आपल्या घराशेजारीच नवीन घर बांधून ते विदेशी लोकांसाठी भाडेपट्टीवर दिलेले होते. मात्र, त्या नवीन घरांचे दरमाही मिळणारे तीस हजार रुपयांचे भाडे  पती ज्युलियो स्वतः आपल्या घशात घालीत असल्याने रोव्हीनाचा राग अनावर झाला होता त्यामुळे त्यांच्यात अधिकच बिनसले होते, प्रकरण घटस्फोट घेण्याची तयारी करण्याइतपत पुढे गेली होते, अशी माहिती खुद्द रोव्हीनाने हणजूण पोलिसांना दिलेल्या जबानीत नोंद आहे. दरम्यान, पदरात दोन मुले असलेली तरुण रोव्हीना लोबो पैशांची चणचण भासू लागल्याने बहुतेक वेळा दांडा शिवोली येथील आपल्या आईच्याच घरी वास्तव्य करून राहायची.

कौटुंबिक विपरीत परिस्थितीचा मनावर ताण पडलेली रोव्हीना लोबो अनेकदा आपल्या लहान मुलांना छातीशी कवटाळून आपल्या एक्टीवा स्कुटरवरुन मार्ना शिवोलीत फिरतांना दिसायची. ना घरचे सुख ना पतीचे अशा विचित्र अवस्थेत सापडलेल्या रोव्हीनाने नवऱ्याच्या आत्यांचा (मार्था-व्हेरा) काटा काढायच्या हेतूने या आधी एक दोनदां त्यांच्यावर त्या झोपलेल्या असतांना वार करून त्यांना जखमी केले होते. या घटनेची नोंद शिवोली पोलीस चौकीवर दाखल झालेली आहे.  दरम्यान, रविवारी दुपारी  कुठल्याही परिस्थितीत मार्था तसेच व्हेराचा काटा काढायचाच या इराद्याने पेटलेल्या रोव्हीना लोबो यांनी आसगांव बार्देशात भाड्याच्या खोलीत राहाणाऱ्या शोभन राजाबली या तरुणाशी संपर्क साधीत हत्याकांडाची योजना आखली होती. त्यानुसार , रविवारी दुपारीच रोव्हीना यांनी शोभन राज्याबली यांना मार्ना शिवोलीत आपल्या घरी आणून घराशेजारीच चाललेल्या बांधकामावर लपवून ठेवले होते.  (शोभन राजाबली याला तबलीकी संस्थांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून याआधी हणजूण पोलिसांकडून चौकशी झाली होती.)

दरम्यान,  रात्री साडेनऊच्या सुमारास पती ज्युलियो लोबो हा बाजारात मद्य प्राशन करण्यासाठी गेल्याची संधी साधत रोव्हीनाने याच संधीचा फायदा घेतला आणी सहकारी  राजाबली याच्या मदतीने घरातील दिवे सर्वप्रथम  मालवून टाकले. यावेळी काळोखाचा कानोसा घेत पुढे आलेल्या  मार्था लोबो यांच्या डोक्यावर सर्वप्रथम कोयत्याचे जोरदार घाव घालीत त्यांना यमसदनी पाठविले व त्यापाठोपाठ मार्थाच्या आवाजाने खोलीतून बाहेर आलेल्या व्हेराचाही दोघांनी काटा काढला. अंगावर शहारे आणणारी ही घटना त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीसमोर घडल्याने रक्ताच्या चिरका़ंड्या अंगावर घेत त्या चिमुरडीने घराबाहेर धांव घेतली आणि जोरदार किंकाळ्या मारून शेजाऱ्यांना सावध केले. दरम्यान, रोव्हीना लोबो यांनी यावेळी क्षणाचाही विलंब न लांवता आपला छोटा मुलगा तसेच सहकारी शोभन राजाबली यांच्यासह घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट आसगांव गाठले.

दरम्यान, मद्यप्राशन आटोपून घरी पोहोचलेल्या ज्युलियोने तात्काळ या घटनेची माहिती पणजीतील मुख्य पोलिस नियंत्रण कक्षाला दिली आणि सहा तासांच्या आत हणजूण पोलिसांनी आंसगांव बार्देश येथून शोभनच्या खोलीवरून रोव्हीना लोबो आणि शोभनला ताब्यात घेतले. सध्या दोघाही आरोपींना सात दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडी फर्मावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत मार्था तसेच व्हेरा यांच्या दुहेरी हत्यांकांडानंतर पती ज्युलियोचाही खून करण्याचा रोव्हीनाचा बेत होता, परंतु दैवी संयोग आणि  मुलीच्या हंबरडा फोडून ओरडण्याने रोव्हीनावर सहकारी शोभन राजाबलीसह घटनास्थळावरुन पळ काढावा लागला आणी हा बेत  फसल्याचे हणजूण पोलिस सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा:

 

संबंधित बातम्या