देशवासीयांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण; सरसंघचालक मोहन भागवत

प्रतिनिधी
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

संतांच्या व धर्मपीठांच्या धर्मकार्यातून श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार असून देशवासीयांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मनोगतातून व्यक्त केले.

खांडोळा - हिंदू धर्मातील एकता हीच आपल्या संस्कृतीचे देणे आहे. त्यामुळे यासाठी देव, देश व धर्म याबाबत ऐक्य आवश्यक आहे. धर्मकार्याच्या मुळात मातृभूमी आहे. संतांच्या व धर्मपीठांच्या धर्मकार्यातून श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार असून देशवासीयांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मनोगतातून व्यक्त केले.

श्रीराम मंदिर निर्माण आंदोलनात पद्मनाभ शिष्य संप्रदाय पूर्व पीठाधीश्वर ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी गोमंतकीयांचे यशस्वी नेतृत्व केले होते. तसेच विद्यमान पीठाधीश्वर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सभा, बैठकांच्या माध्यमातून यशस्वी नेतृत्व केले आहे. अशा या देदिप्यमान कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ३१ जानेवारी रोजी गोमंतकाचे ह्रद्य हिंदू धर्मपीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या समाधीस्थानी पुष्पांजली अर्पण करून पीठाधीश्वर धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दर्शनार्थ विशेष भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी सरसंघचालक प्रतिपादन करीत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवाप्रदेशाचे संघचालक - नाना बेहरे, सतीश धोंड, सुमंत आमशेकर, प्रांतप्रमुख गोवा, श्री दत्त पद्मनाभ पीठाचे संचालक, जनरल मॅनेजर, कृपाकांक्षी व शिष्यगण  उपस्थित होते. सूत्रसंचालन - श्रीराज शेलार व दीपक गावस यांनी केले.

ऐक्याचे धोरण हिंदूंनी जपावे : ब्रह्मेशानंदाचार्य
भारत देशाच्या श्रद्धेचा विषय असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माणार्थ अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीराम जन्मभूमी संदर्भातील निकाल अत्यंत शांततापूर्ण व सकारात्मक पद्धतीने लागल्याने सर्व देशभर अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू ऐक्याचे धोरण हिंदूंनी जपावे. हिंदूंनी धर्मकार्यासाठी जागृत होण्याची आवश्यकता आहे. हिंदू हा संप्रदाय कार्याचा प्रमुख बिंदू आहे व धर्मकार्य हा संप्रदायाचा प्राण आहे, असे उद्‌बोधन ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनातून केले. याप्रसंगी, श्रीराम मंदिराच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या समाधीचे दर्शन करून श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. तसेच ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले.

संबंधित बातम्या