संघाचे स्वयंसेवक देशसेवा करताना स्वत: विवाहबद्ध होण्याचेही विसरून जातात. : प्रा. गोविंद पर्वतकर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पार्टीचा पाया आहे, असे नमूद करून प्रा. पर्वतकर पुढे म्हणाले, संघाचे स्वयंसेवक देशसेवा करताना स्वत: विवाहबद्ध होण्याचेही विसरूनच जातात.

म्हापसा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे, असा दावा भाजप नेते प्रा. गोविंद पर्वतकर यांनी केला.
मयडे येथे आयोजित हळदोणे मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य तथा पक्षाच्या माध्यम विभागाचे प्रमुख या नात्याने मार्गदर्शन करताना बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पार्टीचा पाया आहे, असे नमूद करून प्रा. पर्वतकर पुढे म्हणाले, संघाचे स्वयंसेवक देशसेवा करताना स्वत: विवाहबद्ध होण्याचेही विसरूनच जातात.

त्यामुळे कित्येक प्रचारक व स्वयंसेवक आयुष्यभर अविवाहितच राहिले आहेत. त्यापैकी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. संघाचे कित्येक कार्यकर्ते आयुष्यभर भिक्षा मागूनच संघटनेचे कार्य करीत आले आहेत. भिक्षा हा पवित्र संस्कार आहे. भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी, हे या दृष्टीने ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
भाजप, राष्ट्रसेविका समिती, भारत प्रकाशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ अशी अपत्ये संघातून निर्माण झाली असून राष्ट्रोद्धारासाठी असे विविध समाजघटक समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत, असेही प्रा. पर्वतकर म्हणाले.

आमच्या राष्ट्राला पुरातन काळात परमवैभव प्राप्त होते. असे असतानाही परकीयांच्या आक्रमणणांमुळे आम्ही पिछाडीवर गेलो. ब्रिटिशांनी आम्हा भारतीयांना ‘ब्लॅक डॉग’ असे संबोधून आमच्यांतील न्यूनत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आमचे स्वत्व विसरूनच गेलो; पण, हळूहळू भारतीय जनतेत स्वाभिमान जागृत होत आहे. आमच्यात एकी झाली तरच कोणतेही परकीय राष्ट्र आमच्याकडे वाकड्या नजरेतून पाहूच शकणार नाही, असेही प्रा. पर्वतकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या