टाळेबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

व्यवसायांवर मर्यादा आल्याने डिचोली तालुक्यातील लहान घटक संकटात

डिचोली: कोरोना महामारी संकटाचा प्रतिकार करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटी लागू केलेल्या टाळेबंदीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर हळूहळू परिणाम जाणवू लागला. आधीच खाणबंदीमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडलेल्या डिचोली तालुक्‍यातील बहुतेक ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ढासळू लागली. टाळेबंदीचा खास करून ग्रामीण भागातील जनतेला मोठा फटका बसला. लहानसहान व्यवसाय बंद राहिल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक कमाईचे स्त्रोत बंद झाले. टाळेबंदी काळात ग्रामीण भागातील आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाल्याचा अंदाज आहे. 

टाळेबंदीमुळे खासगी आस्थापनात जाणाऱ्या अनेकांवर घरी बसण्याची पाळी आली. सुरवातीस साधारण महिनाभर जीवनावश्‍यक वस्तूंसाठी मारामारी सहन करावी लागल्याने सामान्य जनता मेटाकुीस आली. टाळेबंदीचा फायदा उठवत जीवनाश्‍यक वस्तूही महाग झाल्याने सामान्य जनता भरडली जाऊ लागली आहे.

शेती व्यवसायाकडे लक्ष
एकाबाजूने टाळेबंदीमुळे सामान्य जनता संकटात आलेली असतानाच, रिकामा वेळ मिळाल्याने अनेकांमधील कष्टकरी भावना जागृत झाली. काहीजणांनी मिळालेल्या रिकाम्या वेळेचा पुरेपर फायदा उठवत शेती, भाजी लागवडीकडे लक्ष दिले. स्थानिक भागातच भाजीला मागणी होऊ लागली. भाजी विक्रीतून तर ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांच्या हाती पैसे घोळू लागले. मागील वर्षीच्या तुलनेत डिचोलीत यंदा ३० हेक्‍टर अतिरिक्‍त शेतजमीन लागवडीखाली आली आहे. त्यामुळे टाळेबंदीमुळे काहीजण पुन्हा शेती व्यवसायाकडे वळल्याचे आढळून आले आहे. डिचोलीत वास्तव्य करून राहणारे बहुतेक मजूर आपल्या गावाकडे ग्रामीण भागातील भाड्याच्या खोल्या आणि घरे रिकामी झाली. भाड्याच्या रुपाने मिळणारी मिळकत बंद झाली. बारीकसारीक कामांसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले. त्यामुळे यंदा जनतेला बारीकसारीक कामे स्वत:च करावी लागली. एकाबाजूने मिळकत बंद झाली, तरी दुसऱ्या बाजूने बहुतेकांचा मजूरांवर होणारा खर्च वाचला. काजू पीक हंगामाच्या तोंडावरच टाळेबंदी लागू झाल्याने ग्रामीण भागातील बागायतदारांना नियमितपणे काजू बागायतींत जाता येत नव्हते. त्यामुळे सुरवातीस काजू पिकाची नाशाडी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काजूबियांना दरही अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही. त्यामुळे यंदा काजू बागायतदारांना फटका बसून अर्थकारण हलले.

उत्सव बंदीमुळे परिणाम
जमाव आणि टाळेबंदीमुळे जत्रा आदी प्रमुख उत्सव रद्द करण्याची पाळी आली. त्यामुळे यंदा ऐन जत्रांच्या मोसमात डिचोली शहरासह गावोगावी जत्रा आदी उत्सव झालेच नाही. जत्रा आदी उत्सव म्हटले, की फूल विक्रेते आदी लहान घटकांच्या धंद्याला जोर येत असतो.  उत्सव रद्द झाल्याने फुले, खेळणी आदी साहित्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या धंद्याला ‘ब्रेक’  पडला. त्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेते आर्थिक संकटात आले. जत्रा, उत्सव काळात विक्रेत्यांची दरवर्षीप्रमाणे होणारी कमाई यंदा झाली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी काहींनी रस्त्यावर बसून मासळी, भाजी, नारळ आदी जीवनाश्‍यक वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

संबंधित बातम्या