कोविड समस्या व सुरक्षिततेला प्राधान्य 

dainik gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

राज्यात हॉटेले खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातून अनेक पर्यटक गोव्यात येतील. त्यांची सुरक्षा तसेच सुरक्षितता हे एक आव्हान असेल.

पणजी

कोविड - १९’च्या महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरक्षितता व कोरोनाबाधित पोलिसांचे आरोग्य याला प्राधान्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त पर्यटकांची सुरक्षा व वाहतूक व्यवस्था याला महत्त्व दिले जाईल, अशी माहिती गोव्याचे नवे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी आज पदाचा ताबा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. 
आज सकाळी पदाचा ताबा घेतल्यानंतर खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे ही मोठी समस्या पोलिसांसमोर आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच ‘कोविड - १९’च्या लढ्याला सामोरे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना ही लागण कशामुळे झाली याची माहिती जमा केली जात आहे व प्रत्येक प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही महामारी रोखण्यासाठी दिल्ली व इतर राज्यातील पोलिसांनी कोणत्या चांगल्या उपाययोजना आखल्या आहेत त्याची अंमलबजावणी गोव्यातही करण्याचा प्रयत्न राहील. कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढू नये म्हणून ड्युटीवरील पोलिसांना चांगल्या सुविधा देण्याबाबत विचार सुरू आहे. ड्युटीवर असताना कर्तव्य बजावताना काही प्रमाणात धोका पत्करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. 
राज्यात हॉटेले खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातून अनेक पर्यटक गोव्यात येतील. त्यांची सुरक्षा तसेच सुरक्षितता हे एक आव्हान असेल. गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच तपासकामात प्रगती करण्यासाठी काही ठोस पावले उचलली जातील. गोवा पोलिसांचे तपासकाम नेहमीच चांगले झाले आहे. जी प्रकरणे तपासाविना प्रलंबित आहेत त्याचा तपास सुरू केला जाईल. 
ज्या प्रकरणांचा छडा लागलेला नाही त्यासाठी प्रयत्न केले जातील. क्राईम ब्रँच अधिक सक्रिय केली जाईल. राज्यात पर्यटक तसेच उद्योगात वाढ होत असल्याने वाहतूक व्यवस्थेला अधिक महत्त्व दिले जाईल. रस्ता अपघातावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सुरळीत वाहतुकीवर भर दिला जाईल. महिला, मुले व विदेशी नागरिकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांच्या तपासाला प्राधान्य दिले जाईल. पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासंदर्भातही चर्चा झाली. त्यामध्ये जे कर्मचारी बढतीसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांना बढती देण्याचा तसेच रिक्त जागा भरण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले. 
राज्यात पुन्हा टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे त्याबाबत कोणती पावले उचलण्यात येतील असा प्रश्‍न महासंचालक मीणा यांना केला असता ते म्हणाले, आज माझा पहिलाच दिवस असून राज्यातील गुन्हेगारीबाबत सखोल चर्चा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली जाईल. त्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही केली जाईल. गोव्यासंदर्भात मला थोडी माहिती आहे. कारण १९९२ - ९३ या साली मी फोंडा उपविभागीय अधिकारी होतो. पत्रकारांनी वृत्त प्रसिद्ध करताना खरी माहिती द्यावी. जर पोलिस चुकीच्या पद्धतीने वागत असतील, तर त्यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध कराव्यात ज्यातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या चुका सुधारता येतील, असे मीणा म्हणाले. 

राज्यातील पोलिसच कोरोनाबाधित होऊ लागल्याने सावधगिरी म्हणून पोलिस ठाण्यामध्ये लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जे कोणी तक्रारी घेऊन येतील त्यांच्यासाठी प्रवेशद्वारच एक ‘बॉक्स’ ठेवण्यात येईल, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या तक्रारी त्यामध्ये ठेवता येईल. कोरोनाचा प्रसार व त्याची लागण कोविड - १९ च्या लढ्यात असलेल्या पोलिसांना होऊ नये यासाठी ही पद्धत अवलंबण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी दिली. 
 

संबंधित बातम्या