साखळी सार्वजनिक गणपतीचे विसर्जन

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

‘मंगलमूर्ती मोरयाऽऽ’चा जयघोष आणि गणेशभक्‍तांच्या साक्षीत बुधवारी साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पाच दिवसीय गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. 

डिचोली: ‘मंगलमूर्ती मोरयाऽऽ’चा जयघोष आणि गणेशभक्‍तांच्या साक्षीत बुधवारी साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पाच दिवसीय गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. 

कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीमुळे यंदा गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच विसर्जन मिरवणुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे यंदा प्रथमच गणपती विसर्जनावेळी वर्षपद्धतीप्रमाणे प्रचंड आवाज कानी पडला नाही. कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्‍यांची आतषबाजीही झाली नाही. बुधवारी सकाळी गणपतीसमोर गाऱ्हाणे आणि महाआरती झाल्यानंतर गणेशभक्‍तांनी विघ्नहर्त्याचे आशिर्वाद घेतले. 

कोरोनाचे संकट दूर करा, अशी विनवणी मंडळाचे पदाधिकारी आणि गणेशभक्‍तांनी विघ्नहर्त्याजवळ केली. विसर्जन कार्यक्रमात गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र काणेकर, सचिव उपेंद्र कर्पे, विनय कर्पे आदी पदाधिकारी आणि गणेशभक्‍त उत्साहात सहभागी झाले होते. सायंकाळी उशिरा ‘मंगलमूर्ती मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा विघ्नहर्त्याचा जयघोष करीत रात्री साखळीतील नदीत गणपतीचे विसर्जन करून ‘बाप्पा’ भावपूर्ण निरोप दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतले आशीर्वाद
तत्पूर्वी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी साखळी गणेशोत्सव मंडळाच्या मंगलमूर्ती श्री गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र काणेकर, विनय पांगम आदी पदाधिकारी तसेच पुजारी अनंत फातर्पेकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या