साखळी पालिकेला लवकरच स्वतंत्र मुख्याधिकारी

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; साखळी पालिका नूतन वास्तूचे लोकार्पण

साखळी

साखळी पालिकेला लवकरच पूर्णवेळ स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्यात येईल तसेच महिन्यातून एक दोन वेळा डिचोलीचे मामलेदारही साखळी पालिकेत उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
साखळी पालिकेच्या नूतन वास्तूचे फीत कापून लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी साखळी पालिकेचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, उपनगराध्यक्ष कुंदा माडकर, नगरसेवक यशवंत माडकर, राया पार्सेकर, अंसिरा खान, ज्योती ब्लेगन, शुभदा सावईकर, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, राजेश सावळ, माजी नगराध्यक्ष रियाज खान, माजी सरपंच प्रविण ब्लेगन, साखळी पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, की साखळी पालिकेच्या नवीन इमारत प्रकल्पाला बराच कालावधी लागला. त्याला सरकार जर कारणीभूत असेल, तर तेवढेच पालिका मंडळही जबाबदार आहे. याला विविध कारणे असू शकतील. आता उणी दुणी काढत बसण्याऐवजी अशा प्रशस्त नवीन इमारतीचा लाभ पालिका मंडळाने जनतेच्या सेवेसाठी करून द्यावा. या पालिका इमारतीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी सांगितले, की सरकारने साखळी पालिकेची वास्तू पूर्ण करुन लोकार्पण केल्याबद्दल मुख्यमंत्री व सरकारला धन्यवाद दिले. या इमारतीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनल्यानंतर या कामाला चालना मिळाली. या नवीन इमारतीमध्ये सरकारी विविध कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यात येतील. तसेच जुन्या इमारतीमधील खाली केलेली सोळा दुकाने या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आली आहेत. साखळी पालिकेला सरकारने ब गट दर्जा दिला आहे, परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. सरकारने स्वतंत्र पूर्णवेळ मुख्याधिकारी व मामलेदार देऊन साखळीवासीयांची सोय करावी.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या हस्ते फित कापून या साखळी पालिका नूतन वास्तू उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संपूर्ण नवीन इमारतीमध्ये फिरून इमारतीची पाहणी केली.

पालिकेत आमदारासाठी कार्यालय हवे
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की साखळी पालिकेमध्ये स्थानिक आमदारासाठी एखादे कार्यालय असावे. जेणेकरून आपल्याला नागरिकांशी साखळी पालिकेत अधुनमधून येऊन हितगुज साधता येईल. आमदार कार्यालयासाठी साखळी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. साखळीतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहे. ‘कोविड’ विषाणूच्या महामारी युध्दामुळे काही विकासकामे बंद पडली असली, तरी गोवा अद्याप कोरोनापासून सुरक्षित आहे याचा गोमंतकीयांनी अभिमान बाळगावा. आता विकासकामांना पुन्हा सुरवात झाली आहे. सरकार आर्थिक अडचणीत आहेच, पण यातून सरकार निश्चित मार्ग काढणार आहे.

पायाभरणी ११ वर्षांपूर्वी, दोन वेळा उद्‍घाटन
साखळी पालिकेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी २००९ मध्ये घालण्यात आली होती. इमारत पूर्ण होऊन लोकार्पण करण्यास तब्बल अकरा वर्षे लागली. या इमारतीसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. २०१६ मध्ये उद्‍घाटन झालेल्या या इमारतीचे आता २०२० मध्ये पुन्हा उद्‍घाटन करण्यात आले. ११ वर्षांपूर्वी पायाभरणी करण्यात आलेल्या या इमारतीचे दोन वेळा करण्यात आले. याबद्दल साखळी परिसरात हा एक चर्चेचा विषय बनला.

संबंधित बातम्या