साखळीतील स्थानिक व्यावसायिकांना फटका

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

साखळीत दिवसेंदिवस बिगर गोमंतकीय व्यापारी आपले हातपाय पसरत आहेत त्याचा फटका साखळीतील स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना अनेक समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप साखळीतील व्यापाऱ्यांनी केला आहे.

साकळी : साखळीत दिवसेंदिवस बिगर गोमंतकीय व्यापारी आपले हातपाय पसरत आहेत त्याचा फटका साखळीतील स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना अनेक समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप साखळीतील व्यापाऱ्यांनी केला आहे. या विषयावर साखळीतील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन परराज्यातील व्यावसायिकांविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धारही केला आहे. साखळी व्यापारी संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर साखळीतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या.

साखळीतील व्यापाऱ्यांनी सांगितले, की बिगर गोमंतकीय भाड्याची दुकाने घेऊन आपला व्यवासाय सुरू करतात. नंतर आपल्या इतर नातलगांनाही बोलावतात. यासाठी पुरवलेली कागदपत्रेही बेकायदेशीर असतात. व्यवसायाच्या नावाखाली इतर बेकायदेशीर गुन्ह्यांमध्येही त्यांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकेकाची एकापेक्षा जास्त दुकाने झालेली आहेत. त्याचा परिणाम स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर  झाला आहे. मायनिंग बंद झाल्यामुळे साखळीतील व्यावसायिकांना ठोकर बसली व सध्या कोरोनामुळे व्यवसाय मंदीत भर पडून गंभीर  आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, परराज्यातील व्यावसायिकांवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे व्यवसायाच्या नावाने इतरही काळेबेळे बेकायदेशीर धंद्यामध्ये हे लोक गुंतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिगर गोमंतकीयांच्या सर्व व्यवसायाची कसून चौकशी करावी, अशी मागणीही स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.

सध्या बेरोजगारी वाढली आहे. नोकऱ्या नाहीत. काही स्थानिक लोक व्यापार, व्यवसायाद्वारे आपली उपजिविका चालवतात. त्यांनाही अशी बिगर गोमंतकीयांची अडचण भासू लागली तर जगावे कसे? असा सवालही व्यापाऱ्यांनी केला आहे. संपूर्ण व्यापार जर बिगर गोमंतकीयांच्या हातात गेला तर पुढील पिढीने काय करावे? त्यांचे भवितव्य काय? पुढील पिढी आम्हाला माफ करेल काय? असा सवालही व्यापाऱ्यांनी केला. हा लढा पुढील पिढीच्या भवितव्यासाठी असून आताच जागृत राहून बिगर गोमंतकीयांच्या विरोधात लढण्याचे ठरवले आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
साखळीचा मास्टर प्लॅन विकास साकारत आहे. ही साखळीवासीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. साखळीचा नवीन मार्केट प्रकल्प, बगल रस्ता यामुळे साखळी बाजाराला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सरकार व साखळी पालिका प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री साखळीचे असल्याने या कामाला चालना मिळणार आहे. साखळीच्या मास्टर प्लॅनमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांच्या समस्येचा समावेश व्हावा, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांचा हा विषय गंभीर असून केवळ व्यापाऱ्यांसाठीच मर्यादित नाही.

गोव्यात सरकारी नोकरीसाठी पंधरा वर्षांचा स्थानिक राहिवासी दाखला सक्तीचा आहे. तसाच गोव्यात व्यवसाय करायचा असेल, तर पंधरा वर्षांचा स्थानिक राहिवासी दाखला सक्तीचा करावा. तसा कायदा करावा, अशी मागणी साखळीतील व्यापाऱ्यांनी केली आहे. असा कायदा केल्यास परराज्यातील व्यावसायिकांना आळा बसेल, अशी मागणी स्थानिक व्यवसायिकांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, मुख्याधिकारी प्रविणजय पंडित, साखळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान काणेकर, सचिव प्रियेश डांगी, नितेश कामत, सिध्देश काणेकर, श्याम पेडणेकर, यशवंत देसाई, अनिल काणेकर, शिवप्रसाद काणेकर, शोएब आगा, नंदू बुडकुले, रुपेश सरनाईक, विनय पांगम, नवाझ खान या व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बिगर गोमांतकीय व्यवसायाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले व वीस दिवसांची मुदत मागितली. व्यापाऱ्यांच्या इतर मागणीकडेही लक्ष पुरविले जाईल याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

संबंधित बातम्या