साळावलीचे धरण तुडुंब...

Manoday Phadte
शुक्रवार, 10 जुलै 2020

सांगेचे आकर्षण आणि संपूर्ण गोव्यातील पर्यटकांना चातकासारखी प्रतीक्षा करायला लावणारे साळावलीचे जलाशय तुडुंब भरल्याने या जलाशयातील पाणी आज रात्री ८.२५ वाजता बेचाळीस मीटर उंचावरून खाली कोसळू लागले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साळावली धरण आठ दिवस अगोदर पूर्ण भरले आहे.

सांगे

कोरोना संक्रमण फैलाव होऊ नये म्हणून सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी पर्यटकांना पर्यटन स्थळावर बंदी घातल्याने यंदा पर्यटकांना मजा लुटता येणार नाही.
गत वर्षी साळावली धरण १७ जुलै रोजी पूर्ण भरले होते. त्यामानाने यंदा पाऊस उशिरा पडूनही आठ दिवस आधीच धरण भरले. तरीही गेल्या आठ दहा दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयात पाणी साठा वाढला. बेचाळीस मीटर उंचावरून पडणारे पाणी खाली कोसळताच त्यातून उडणारे पाण्याचे तुषार आणि दवबिंदू टिपण्यास पर्यटकांची याठिकाणी दरवर्षी गर्दी होत असते. मात्र, यंदा सांगेतील साळावली धारणासह सर्व पर्यटन स्थळावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्याने पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटता येणार नसल्याने खास करून तरुणाईला हिरमुस व्हावे लागणार आहे.
साळावली जलाशय पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश शुल्क भरावे लागत असे. त्यातून धरणाखाली असलेल्या ‘बॉटनिकल गार्डन’मध्ये पर्यटकांना फेरफटका मारायला मिळत असल्याने वन विकास महामंडळाला शुल्क भरावे लागत असल्याने महामंडळाची बऱ्यापैकी मिळकत होत होती. कोरोनामुळे या मिळकतीला मुकावे लागले आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या