निडरतेपुढे ‘कोविड’ संसर्गही हतबल!

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

गेल्या कित्येक महिन्यांपासून आपला देश आणि राज्य कोविड महामारीविरुद्ध लढा देत आहे. यामध्ये सर्वांत महत्त्‍वाची भूमिका डॉक्टर आणि परिचारिका, तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणारे आरोग्यसेवक पार पाडत आहेत.

पणजी: गेल्या कित्येक महिन्यांपासून आपला देश आणि राज्य कोविड महामारीविरुद्ध लढा देत आहे. यामध्ये सर्वांत महत्त्‍वाची भूमिका डॉक्टर आणि परिचारिका, तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणारे आरोग्यसेवक पार पाडत आहेत. या लोकांना अनेकवेळा कित्येक दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. घरी गेले तरी आपल्यामुळे कुटुंबातील सदस्‍यांना कोविडचा संसर्ग होऊ शकतो. त्‍यामुळे घरच्यांचा सहवासही अनुभवता येत नाही. तरीही आरोग्‍य खात्‍यातील डॉक्‍टर, परिचारिका व अन्‍य कर्मचारी सेवा बजावत आहेत. 

सरकारी इस्पितळासह खासगी इस्पितळातील आरोग्य सेवकही कटिबद्धपणे कार्यरत आहेत. अनेकांना यामुळे कोविडचा संसर्गही झाला. त्‍यांनी त्‍वरित स्वतःवर उपचार करून घेऊन हे योद्धे पुन्हा तत्परतेने कोणत्याही प्रकारचा बाऊ न करता, न घाबरता पुन्हा सेवा करण्‍यास सज्ज झाले आहेत. यामध्ये सर्वांत मोठी जबाबदारी परिचारिका निभावताना दिसून येत आहेत. काहींच्या ड्युटी १५ - १५ दिवस असतात, तर काहींना बऱ्याचवेळी अतिरिक्त काम करावे लागत आहे. आरोग्य सेवक तत्परतेने उभे दिसतात.

आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक पुरुष आणि महिला डॉक्टर तसेच परिचारिका खोल्या, फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. सुरवातीला भाड्याने खोली मिळत नव्‍हती. मात्र, आता जनजागृती झाल्याने विरोध मावळल्याची माहिती एका परिचरिकेने दिली.

सार्थक झाल्यासारखे वाटते : डॉ झेनिन 
सध्याची परिस्थिती पाहता आम्हा डॉक्टरांवर खूप मोठी जबाबदारी आहे. आम्हीही त्या दृष्टीने कार्यरत आहोत. सर्व लोक आमच्याकडे कोरोना योद्धा म्‍हणून बघतात, आदर देतात  आणि देवाच्या ठिकाणी मानतात. मात्र आम्ही आमचे कर्तव्य करीत आहोत. खरेतर लोकांची आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने मला डॉक्टर झाल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते, असे डॉ. झेनिन खान यांनी सांगितले. डॉ. झेनिन या गेल्या दोन महिन्यांपासून घरी गेल्या नाहीत. त्या मडगावातील रहिवासी आहेत.

संबंधित बातम्या