गोव्यातील पंचायतींसाठी 'समान केडर' १ जानेवारीपासून लागू केलं जाणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

राज्यात सर्व पंचायतींसाठी गेल्यावर्षी तयार केलेले समान केडर १ जानेवारीपासून लागू केले जाणार आहे. पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा हक्क पंचायत संचालकांना असेल.

पणजी :  राज्यात सर्व पंचायतींसाठी गेल्यावर्षी तयार केलेले समान केडर १ जानेवारीपासून लागू केले जाणार आहे. पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा हक्क पंचायत संचालकांना असेल. त्यामुळे गेली कित्येक वर्षे एकाच पंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागणार आहे. या बदल्यांमुळे पंचायतींमधील कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होणार आहे. 

पंचायतीमधील कर्मचारी वर्गाच्या बदल्या करण्याची तरतूद किंवा हक्क पंचायत संचालकांना नव्हते. त्यामुळे पंचायतीमध्ये कारकून व शिपाई म्हणून कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नव्हत्या. एकाच जागी कामाला असल्याने या कर्मचाऱ्यांना पंचायतीतील बारकावे याची पूर्ण माहिती होती. तसेच त्या पंचायत क्षेत्रातील काही व्यवसायिकांशीही लागेबांधे बनले होते. पंचायतीमधील कथित गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचाराचे प्रकार घडण्याच्या घटनाही उघडकीस आले होते, त्यामुळे पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान केडर करून इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांच्याही बदल्या करण्याबाबत निर्णय झाला होता. मार्च २०२० मध्ये हा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता ही अंमलबजावणी येत्या नववर्षात करण्याचे ठरले आहे. 

संचालनालयाच्‍या आदेशानंतर बीडीओंकडून अंमलबजावणी

पंचायत संचालनालय पंचायतीमधील कर्मचाऱ्याच्या बदल्या करणारी अधिकारिणी असेल. प्रशासकीय किंवा इतर कारणासाठी या बदल्या केल्या जाणार आहेत. एकाच पंचायतीमध्ये गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना पंचायतीचा असलेल्या गटात किंवा इतर पंचायतीच्या गटात बदली आवश्‍यकतेनुसार केली जाणार आहे. त्यांना बदल्यांचा आदेश हा बंधनकारक राहणार आहे. या ‘समान केडर’च्या नव्या नियमावलीनुसार पंचायत संचालकांनी बदल्यांचा आदेश काढल्यानंतर संबंधित पंचायतीच्या गटविकास अधिकाऱ्याकडून (बीडीओ) त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठीचे लेखी पत्र पंचायतीला पाठविले जाणार आहे. पंचायत सचिवांनी या पत्रानंतर त्या कर्मचाऱ्याला त्वरित तेथील सेवेतून मुक्त करायचे आहे व या कर्मचाऱ्याने बदली झालेल्या ठिकाणी वर्णी लावणे सक्तीचे आहे. 

बदली झाल्‍यानंतर...

बदली झालेल्या पंचायत कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करताना पंचायत सचिवाने देण्यात येणाऱ्या पत्रावर त्या दिवसाची तारीख तसेच वेतनाची प्रत व प्रमाणपत्र द्यावे. या पत्रावर वेतनाची सविस्तर माहिती तसेच इतर भत्ते व वेतनातून काही रक्कम कपात केली जात असल्यास त्याचाही उल्लेख करण्यात यावा. पंचायत संचालनालयाने मार्च २०१९ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पंचायत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबरोबर त्यांना दरवर्षीची वेतनवाढ, वैद्यकीय उपचारासाठी केलेला खर्च तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी मुलांची काळजी घेण्यासाठी असलेली सरकारी रजा (सीसीएल) लागू होणार आहे.

संबंधित बातम्या