रेतीला पायघड्या; जीवनावश्‍यक वस्तूंना आडकाठी

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

पत्रदेवी चेकनाक्यावरील कारभार : तपासणीसाठी तिष्ठावे लागते तासन्तास

मोरजी

पत्रादेवी चेक नाक्यावर महाराष्ट्रातून गोव्यात रेती घेऊन येणाऱ्या वाहनांना खास वागणूक तर दूध मासे, भाजी, कोंबडी, कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने संबंधित वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दर दिवशी सुमारे २००-२५० ट्रक रेती घेऊन गोव्यात येत असतात.
याबद्दल या तपासणी नाक्यावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने दिलेली माहिती अशी की, पत्रादेवी चेक नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी तसेच विविध खात्याचे अधिकारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करतात. याठिकाणी तपासणीसाठी सर्व वाहने थांबवली जातात. त्यात प्रामुख्याने रेती वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीतच ही वाहने उभी केल्यानंतर चालक उतरतो चालत २००-२५० मीटर अंतरावर असलेल्या पोलिस चेकनाक्यावर जातो. तिथे जाऊन कोणती जादू करतो, माहीत नाही. मात्र, तिथून तो थेट गाडीपर्यंत पुन्हा येतो आणि भरधाव वेगाने गाडी हाकत निघून जातो. मात्र, जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांना रात्ररात्र भर त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते. तपासणीच्या नावाखाली त्यांना तासन्तास तिष्ठत ठेवले जाते. या वाहनांना सापत्नभावाची वागणूक मिळते तर रेती घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना व्ही.आय.पी वागणूक कशी काय दिली जाते, असा प्रश्न जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना पडला आहे. खर तर दूध, मासे,भाजी, या माणसाच्या जीवनावश्यक वस्तू त्या खूप वेळ राहिल्यास खराब होण्याची शक्यता असते अशा वाहनांना प्राधान्य देण्याची गरज असताना रेती वाहतुकीला खास वागणूक कशी काय दिली जाते. असा प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडला आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, याच तपासणी नाक्यावर गेल्याच आठवड्यात गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या म्हापसा येथील मुस्लिम कुटुंबातील युवकाला गुजरात येथे उपचार करून परत आणले असता पत्रादेवी नाक्यावर त्याचे वाहन रोखून धरले. त्याला गोव्यात प्रवेश नाकारण्यात आला. त्याच्याकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्र सरकारची वाहतुकीची परवानगी होती. मात्र, गोवा हद्धीत त्याला रोखून धरले. गुजरातहून घेऊन आलेले त्याचे वाहन आत घेतले नाही. त्याच्या सेवेसाठी त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या कुटुंबियांनाही सोडले नाही. त्याला अखेर खासगी रुग्णवाहिका बोलावून म्हापसा गाठावे लागले आणि त्याच्या बरोबर मधुमेहाने पिडीत असलेल्या तिच्या आईलाच त्याच्यारोबर सोडले आणि हे सर्व सोपस्कार करण्यासाठी त्याला तब्बल ८ तास पत्रादेवी चेक नाक्यावर घालवावे लागले. म्हापसा येथून त्याचे मित्र त्याठिकाणी आल्यानंतर त्याची सुटका झाली. मात्र, त्याला म्हापसा येथील आझिलो हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. पत्रादेवी चेक नाक्यावर अशाप्रकारे होत असलेली सामान्य नागरिकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

 

संबंधित बातम्या