सांगेतील निसर्ग खुणावतोय...

मनोदय फडते
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

सांगे तालुक्यात निसर्ग देणं भरपूर आहे पण त्यातून परतावा म्हणून फारसे काहीच मिळत नाही. इतर राज्यांत निसर्गाच्या देण्यातून रोजगार निर्मिती केली जात आहे. मात्र सांगे तालुक्यातील बहुतांश भाग आज सत्ता संघर्षात पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे.

‘इको टुरिझम’मधून भरभराट शक्य - पर्यटन खात्याने लक्ष देण्याची मागणी
सांगे - सांगे तालुक्यात निसर्ग देणं भरपूर आहे पण त्यातून परतावा म्हणून फारसे काहीच मिळत नाही. इतर राज्यांत निसर्गाच्या देण्यातून रोजगार निर्मिती केली जात आहे. मात्र सांगे तालुक्यातील बहुतांश भाग आज सत्ता संघर्षात पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. सांगेत मोठ्या प्रमाणात पर्यटनवृद्धी करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ज्यातून सांगेचा पर्यटन दृष्टीने विकास शक्य आहे. प्रत्येकवेळी सरकार सांगेचा इको टुरिझमद्वारे विकास करण्याच्या वारेमाप घोषणा करते. पण प्रत्यक्षात विकास करताना सत्ता आडवी येऊ लागल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन कोणत्याही हालचाली होऊ शकत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

सांगेतील आकर्षक देवस्थान, डोळ्यांचे पारणे फेडणारे फेसाळते धबधबे, तरुणांना आकर्षण ठरलेले गिर्यारोहण ठिकाणे, मन प्रसन्न करणारी वनराई आणि हिरवीगार बागायती, पर्यटकांना भुरळ घालणारे साळावली धरण, त्या खालील मन रिझवणारे बोटॅनिकल गार्डन, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीला पावलेले साळजीणी गाव अशी कित्येक ठिकाणे आहेत. ज्या योगे सांगेचा भरपूर विकास करून पर्यटन हब म्हणून विकास केल्यास सांगेत रोजगार निर्मिती बऱ्याच पैकी होऊ शकते. निधान यावेळीच्या गोवा सरकारने आपल्या बजेट मध्ये सांगेच्या पर्यटन वृद्धी साठी निधीची तरतूद करण्यात यावी जेणेकरून सांगेतील रोजगार निर्मितीला चालना मिळू शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगे भागात येताच दिड किमी वर सांगेचे आराद्य दैवत श्री पाईकदेव देवस्थान आहे. सभोवतालचा परिसर बागायतीने नटलेला आहे. पण तीत पर्यंत जाण्यासाठी मोठया पुलाची सोय नाही. मंदिर हे सांगेतील प्रमुख ठिकाण असूनसुद्धा राज्यातील इतर मंदिरांप्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात आलेली नाही. लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमासाठी उपयुक्त जागा, पार्किंगची चांगली सोय आहे पण मोठा रस्ता नसल्याने बसगाडीसुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नसल्याने नागरिक आणि देवस्थानचा विकास झालेला नाही.

सांगे शहराच्या अवघ्या चार किलोमीटरवर साळावली धरण आणि त्या खाली बोटॅनिकल गार्डन प्रकल्प आहे. या दोन्हीही ठिकाणी बारामाही पर्यटन व्यवसाय होण्यासारखं आकर्षण आहे. पण सुरुवातीला जे काही होते त्यात सुधारणा घडवून आणल्यास मोठया प्रमाणात पर्यटन व्यवसाय होऊ शकतो. पर्यटक येतात अन जातात पण राहण्याची खाण्या-पिण्याची कोणतीही सुविधा नाही. वृंदावन गार्डनप्रमाणे येथे सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. संध्याकाळी गार्डनमध्ये रेजर लाईट शो, खास हिरवळीवर वाढदिवस साजरा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास आर्थिक उपलब्धी होऊ शकते. वृद्ध, वयस्कर पर्यटकांना धरण प्रकल्प आणि बोटॅनिकल गार्डन परिसर पाहण्यासाठी खास रिक्षा उपलब्ध करणे, तरुणांना भुरळ घालणारा रोप वे तयार करणे, रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाई तयार करणे यासारख्या अनेक सुविधा निर्माण केल्यास पर्यटक आकर्षित होतील.

उगे गावात देवस्थानचा परिसर मन प्रसन्न करणारा ठरतो. अनेक देवदेवतांची लहान-मोठी मंदिरे देवस्थान समितीने भक्त आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून निर्माण केलेली पाहायला मिळत आहे. भाटी परिसरातील श्री सिद्धनाथ पर्वत हे तरुणांसाठी आकर्षण ठरले आहे. पावसाळी पर्यटन असो किंवा अन्य काळात ट्रेकर्स तरुण ट्रेकिंगसाठी जात असतात. वर्षातून एकदा जत्रा होत असल्याने लोकांची डोंगरमाथ्यावर देव दर्शना साठी रीघ लागलेली असते. डोंगरमाथ्यावरून दिसणारा साळावली धरणाचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी तरुण वर्ग आकर्षण म्हणून गर्दी करीत असतात. कोणतीही सुविधा नाही सरकार ने पर्यटन म्हणून विकास केल्यास चांगला पर्यटन स्थळ होऊ शकते. 

वाडे कुर्डी भागात हिरवीगार ऊस शेती अनुभवता येते. वाडे वसाहत क्रमांक एक मध्ये साळावलीच्या जलाशयाचा अथांग भरलेला देखावा जवळून पाहता येतो. संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी बरीच गर्दी होत असते.पुढे नेत्रावळी पंचायत क्षेत्रात प्रवेश करताच पर्यटकाना मनमुराद आनंद लूटणारी एकापेक्षा एक अशी पर्यटन स्थळे पर्यटकाच्या स्वागतास सज्ज असतात. गावात प्रवेश होताच बुडबुड तळी आहे. सरकारने तिथे चांगल्या पद्धतीने सुधारणा केल्याने पर्यटक अधिक वेळ घालवू शकतात. जरा पुढे गेल्यावर श्री. दत्तमंदिर आहे या ठिकाणी सुद्धा सरकारने या भागाचा विकास करून आजू बाजूच्या सौन्दर्य वाढीस हातभार लावला आहे. अजून पुढे गेल्यास सावरी धबधबा मन मोहकपणे पर्यटकांना भुरळ घालीत आहे. वेर्ले नेत्रावळी या मुख्य रस्त्यावरून अर्धा तास पायपीट केल्या नंतर या ठिकाणी पोहचता येथे. वन खात्याने पर्यटकांना येण्या जाण्यासाठी कच्च्या पायऱ्या तयार केल्या आहेत. सर्वाधिक पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. बारामाही वाहणारे नेत्रावळीतील धबधबे ही फार मोठी नैसर्गिक देणगी आहे. अजून पुढे तुडव गावात गेल्यास उदेंगी धबधबा व मैनापी धबधबा भुरळ घालीत आहे. कोणतीही सुविधा नसली तरीही साहस म्हणून तरुणाई मैनापी धबधब्याला भेट देतात. 

पाली धबधबा हा ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. साधारण वयस्कर माणसांना झेपणार नाही पण विशेष करून ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचा अधिक भरणा असतो. देशीविदेशी पर्यटक या धबधब्याची निवड करतात. एकूण चार धबधबे नेत्रावळीत आहेत. जरा डोंगर माथ्यावर वेर्ले गावात गेल्यास स्ट्रॉबेरी लागवड दिलखुलासपणे पाहता येथे. नेत्रावळी गावाला या स्ट्रॉबेरीमुळे नवी ओळख मिळाली आहे. सध्या पर्यटकांची मांदियाळी आहे. 

पर्यटनाच्या विकासात राजकारण नको!
रिवण पंचायत क्षेत्रात पांडवकालीन गुहा, श्री विमलेश्वर मंदिर, जांबवली येथील प्रसिद्ध दामोदर देवस्थान या सर्वच क्षेत्राचा पर्यटनदृष्टीने विकास शक्य आहे. यातून सांगेत रोजगार निर्मिती होऊ शकते. एकूणच सांगे मतदार संघाला वळसा घातल्यास सर्वत्र पर्यटनस्थळे उभी आहेत. गरज आहे ती सत्ता संघर्ष विना रोजगार निर्मितीसाठी विकासकामे पुढे नेण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात खास तरतूद सांगेसाठी करावी जेणेकरून पुढील वर्षभरात चालना मिळेल.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या