सांगे प्रशासकीय इमारतीला लिफ्टची गरज

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना चार मजले चढून जाणे अडचणीचे ठरू लागले आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे तर मोठे हाल होत आहेत. याची दखल घेऊन सांगेचे नगरसेवक संजय रायकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे इमारतीला लिफ्ट बसवण्याची मागणी केली. 

सांगे :  सांगे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीपैकी सर्वात प्रथम माजी आमदार पांडू वासू नाईक यांनी तेहत्तीस वर्षांपूर्वी मामलेदार कॉम्प्लेक्स इमारत उभारण्यात आली. चार मजली इमारतीत सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी विभाग, रस्ता विभाग, नागरी पुरवठा कार्यालय, पशु चिकित्सालय, गटविकास कार्यालय, मामलेदार कार्यालय, तलाठी कार्यालय, लोकसेवा केंद्र अशी विविध सरकारी खात्यांची कार्यालये स्थापित करण्यात आली आहेत, पण लोकोपयोगी पाणी खात्याचे कार्यालय चौथ्या मजल्यावर असल्यामुळे पाण्यासंंर्भात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना चार मजले चढून जाणे अडचणीचे ठरू लागले आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे तर मोठे हाल होत आहेत. याची दखल घेऊन सांगेचे नगरसेवक संजय रायकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे इमारतीला लिफ्ट बसवण्याची मागणी केली. 

सांगेचे माजी आमदार पांडू वासू नाईक यांनी ३१ ऑगस्ट १९८७ साली या प्रशासकीय इमारतीची पाया भरणी केली होती. आज या इमारतीने तेहत्तीस वर्षे पूर्ण केली. वास्तविक मामलेदार कार्यालयाप्रमाणे पाणी विभागाचे कार्यालय खाली असायला हवे होते. बारीक सारीक अडचणी घेऊन वयस्कर मंडळी दमछाक होत मजले चढतात. कित्येकवेळा अर्धा मजल्यावर थांबून परत वर जातात. याची दखल घेत ज्येष्ठ नगरसेवक रायकर यांनी यापूर्वी चर्चिल आलेमाव यांना निवेदन देऊन इमारतीला लिफ्ट बसविण्याची मागणी केली असता केवळ करूया असे उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर सुदिन ढवळीकर मंत्री बनल्यानंतर हीच मागणी घेऊन निवेदन दिले असता त्यांनीही असेच उत्तर दिले. त्याच मागणीविषयी रायकर यांनी विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना निवेदन दिले व वयस्कर लोकांच्या परिस्थितीची जाणीव करून देत कोणत्याही स्थितीत लिफ्ट बसविण्याची मागणी पूर्ण करण्याचा तगादा लावला असता नक्कीच करूया असे उत्तर दिले आहे. 

"या लिफ्टसंदर्भात नक्कीच उपाययोजना केली जाईल असे संकेत मिळू लागले आहेत. लिफ्ट बसविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, पण नंतर बसवू म्हणून गेलेले सार्वजनिक बांधकाम खाते परत जागे झालेच नाही. आता  ही मागणी पूर्ण केल्यास सांगेतील नागरिक नक्कीच मंत्री दीपक पाऊसकर यांना दुवा देतील. "
- संजय रायकर, नगरसेवक

संबंधित बातम्या