बंद असलेला सांगेचा बाजार सुरू

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

सांगेत आठवड्याचा बाजार दर बुधवारी भरत असे, पण गेल्या सहा - सात महिन्यांपासून हा बाजार पूर्णतः थंडावला आहे. पण आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच बंद पडलेला बाजार हळू हळू भरू लागला आहे.

सांगे:  सांगेत आठवड्याचा बाजार दर बुधवारी भरत असे, पण गेल्या सहा - सात महिन्यांपासून हा बाजार पूर्णतः थंडावला आहे. हा बाजार फार मोठा नसला तरी सांगे पुरता पुरेसा आहे, पण गेल्या सहा - सात महिन्यात कोरोना महामारीने ग्रासल्याने सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने आणि पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सांगेत अधिक वाढू नये म्हणून केवळ सुरक्षेच्या दृष्टीने सांगे नगरपालिकेने कोरोनाचा धोका टळेपर्यंत बाजार भरण्याला लगाम लावला होता, पण आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच बंद पडलेला बाजार हळू हळू भरू लागला आहे.

शंभर टक्के नसला तरी पंचवीस तीस टक्के व्यापारी सांगेत दर बुधवारी बाजार भरण्यासाठी येऊ लागले आहेत. आठवड्याचा बाजार असल्याने भाजी, फळे, कापड, मिर्ची मसाला, सुखी मासळी, इतर जिन्नस एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने जनतेची सोय होत असे. आता हळू हळू बाजार वाढू लागल्याने लोकही खरेदीसाठी येऊ लागले आहेत. मात्र, बाजारात पसरलेली महागाई पाहता कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. वाढत्या महागाईला लगाम कोण घालणार. आज कांदे ८० रुपये प्रति किलो झाले आहेत, उद्या नव्वद होणार म्हणून सांगतात. याचा अर्थ दर निश्चित कोण करतो. कोणतीही भाजी घ्या दर आकाशाला भिडलेले आहेत. एकदा दरवाढ होत असल्याचे लक्षात येताच महागाईला सुरवात होते. 

कोरोना महामारीने जनतेचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. काही प्रमाणात विराम मिळत असतानाच आता महागाई जनतेला भरडून काढू लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत जनता सुखी नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बाजारात येणाऱ्या महिला व्यक्त करीत आहेत. हात लावीन त्या वस्तूंचा दर चटका देणार आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना अर्ध्या पगारावर पोट भरावे लागत असताना या महागाईत जीवन कसे जगावे हा प्रश्न बाजारात ऐकू येत आहे.

संबंधित बातम्या