‘आमच्या मागण्या मान्य करा'...'संजीवनी साखर कारखाना सुरू करा'

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 3 जानेवारी 2021

‘संजीवनी साखर कारखाना परत सुरू करा...’, ‘आमच्या मागण्या मान्य करा...’ अशा घोषणा देत ऊस उत्पादक संघर्ष समितीने आज सांगे येथे आपल्या धरणे आंदोलनाला सुरवात केली.

सांगे :  ‘संजीवनी साखर कारखाना परत सुरू करा...’, ‘आमच्या मागण्या मान्य करा...’ अशा घोषणा देत ऊस उत्पादक संघर्ष समितीने आज सांगे येथे आपल्या धरणे आंदोलनाला सुरवात केली. तत्पूर्वी सांगे कॉम्प्लेक्स मैदानाजवळून हातात ऊस घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत जागृती फेरी काढली. पोलिस स्टेशनमार्गे सांगे शहरात ही जागृती फेरी काढून मामलेदार कॉम्प्लेक्सजवळ आंदोलनकर्ते एकत्र आले. जागृती फेरीला सुरवात करण्यापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगेचे जागृत दैवत श्री पाईक देवाचे दर्शन घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी देवाला साकडे घातले. आंदोलन कितीही दिवस चालले तरी त्यासाठी खाण्या पिण्याची व्यवस्था म्हणून भांडी कुंडी, तांदूळ व इतर साहित्य घेऊन आंदोलनकर्ते तयारीत आले होते. या धरणे आंदोलनात समितीचे सल्लागार तथा सांगेचे आमदार प्रसाद गावकर हेही सहभागी झाले होते.

संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत काहीच हालचाली झाल्या नाहीत, पण आदल्या रात्री कृषिमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या निवासस्थानी समिती पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सोमवार, मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करून निर्णय घेण्यात येईल असे सांगून धरणे आंदोलन रद्द करण्याची सूचना केली. त्यावेळी समिती पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा शब्द शेतकऱ्यांना दिला असून देवाची शपथ घेण्यात आल्याने लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिल्याशिवाय धरणे आंदोलन मागे घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज आंदोलनाला सुरवात करण्यात आली. आजच्या धरणे आंदोलनात सांगेचे आमदार प्रसाद गावकर सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, की आपणही शेतकरी असून आपला पूर्ण पाठिंबा या आंदोलनाला आहे. आपण ऊस उत्पादकांच्या समस्या पूर्वीपासून सरकार दरबारी सादर करीत आलो आहे. आपण दिलेला प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला. तो प्रस्ताव स्वीकारून चालीस लावला असता, तर आज शेतकऱ्यांवर रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती. 

नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच आंदोलन 

संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू करा व आपल्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देत ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या आजच्या धरणे आंदोलनाने नव्या वर्षाची सुरवात सांगेत झाली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या आहेत. आंदोलकांसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. साधारण तीनशेपेक्षा अधिक ऊस उत्पादक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार महिला, युवकांसह सर्व आंदोलकांनी केला आहे.
यावेळी ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष कुष्ठा गावकर यांनी आम्ही देवाची शपथ घेऊन आलो आहे. आमची काळजी करू नका. आम्ही कोणालाही त्रास न करता कायदा व सुव्यवस्था सांभाळून लेखी मागणी मान्य करीपर्यंत धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. उपाध्यक्ष चंदन उनंदकर म्हणाले, की आम्ही सरकारला मुदत देऊनच आता धरणे आंदोलनाला बसलो आहोत. आता मागण्या लेखी स्वरूपात मिळवूनच शेतकरी घरी परतणार आहेत.

दरम्यान, गोवा सुरक्षा मंचचे विनय प्रेमानंद नाईक यांनी या आंदोलनाला आपल्या पक्षाच्यावतीने पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तसेच प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष अभिजित देसाई हेही यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
उद्या संपूर्ण राज्यातील शेतकरी प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आदोलकांनी सांगितले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सहभागी झालेल्या महिलांना संध्याकाळी सहा वाजता घरी पाठवून पुरुष मंडळी आंदोलन ठिकाणी ठाण मांडून होते. 

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आंदोलकांची भेट

उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी दुपारी पाऊण वाजता धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व सरकार म्हणून आम्ही या विषयवार मंगळवारी बोलणी करणार आहे, तोपर्यंत तुम्ही रस्त्यावर बसू नका अशी विनंती केली, परंतु आंदोलकांनी ही सूचना मान्य केली नाही.

संबंधित बातम्या