मुरगावात मतदारयादीतून नावे काढण्याचा घाट

Sankalp Amonkar says They are working for BLO under the pressure of Milind Naik
Sankalp Amonkar says They are working for BLO under the pressure of Milind Naik

मुरगाव: दहा महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्तीकडून बायणा भागातील चौदा मतदारांची नावे वगळण्यासाठी मामलेदारांकडे अर्ज केल्याचे प्रकरण कॉंग्रेसनेते संकल्प आमोणकर यांनी मुरगावचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सचिन देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यात बीएलओ घोटाळा करीत असल्याची तक्रार आमोणकर यांनी केली असून, मतदार यादीतून नावे काढण्याचा घाट गेल्याचा आरोपही केला आहे. 

हा प्रकार फसवणुकीचा असून या एकूण प्रकरणाचा कसून तपास केला जाईल, यात बीएलओ गुंतलेले असतील तर त्यांना निलंबित केले जाईल असे आश्वासन निवडणूक अधिकारी श्री. देसाई यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला 
दिले.

मुरगाव मतदारसंघातील सुमारे ९०० मतदारांची नावे वगळण्यासाठी मामलेदार कार्यालयातून प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नावे वगळण्यासाठी बीएलओंकडून खोटी माहिती पुरवली जात आहे. मतदारयादीत समाविष्ट असलेल्या नावांना आक्षेप घेणारे अर्जदार अस्तित्वात नसताना त्यांच्या नावाने अर्ज करून नावे गाळण्यासाठी बीएलओ पुढाकार घेत आहेत असे श्री. आमोणकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिले. बायणात एकाच घराच्या पत्त्यावर ३८ नवीन नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली आहे हेही श्री. आमोणकर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन ह्या एकूण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली.
मतदार यादीतील नावे गाळण्यासाठी आलेल्या अर्जांची शहनिशा केली जाईल. मतदार आणि आक्षेप घेणाऱ्यांना बोलावून घेऊन चौकशी केली जाईल असे निवडणूक अधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
 जर या मतदारयादी घोटाळ्यात बीएलओ गुंतलेले असेल तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित केले जाईल, असे श्री. देसाई यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला आश्र्वासन दिले. 

आणखी वाचा:


मुरगाव मतदारसंघातील शेकडो मतदार यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. ‘आम्हाला न्याय द्या, मतदानाचा हक्क हिरावून घेऊ नका’, अशी मागणी उपस्थित मतदार घोषणा देऊन करीत होते. कॉंग्रेसनेते संकल्प आमोणकर यांच्या समवेत युवाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, शंकर पोळजी, सचिन भगत, उद्धव पोळ, सेबी डिसोझा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मुरगाव मतदारसंघातील मतदार यादीमधील घोटाळ्याची माहिती दिली.

आमदार मिलिंद नाईक यांच्या दडपणाखाली बीएलओ... 
मुरगाव मतदारसंघात एकूण २९ विभाग आहेत. त्यापैकी २१ विभागांत एकट्या वीज खात्यातील कर्मचारी बीएलओचे काम करतात. ते सर्व कर्मचारी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक वीज मंत्री असताना वीज खात्यात कामाला लागलेले आहेत. त्यामुळे ते मिलिंद नाईक यांच्या दडपणाखाली ‘बीएलओ’चे काम करीत आहेत, असा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला. तसेच अन्य मतदारसंघात वेगवेगळ्या सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांना बीएलओ म्हणून नियुक्त केलेले आहे.

संबंधितांची पोलिस चौकशी करा
मुरगाव उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. देसाई यांच्याकडे या एकूण घोटाळ्याचा तपास करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आमोणकर यांनी केली. मृत व्यक्तीच्या नावाने अर्ज करुन १४ मतदारांची नावे वगळण्यासाठी बीएलओकडून सादर केलेला अहवाल, तसेच नाशिक (महाराष्ट्र) येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक देऊन आक्षेप घेणे याचीही चौकशी करून संबंधितांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करावी, अशी मागणी श्री. आमोणकर यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com