सांताक्रुझ भागात वीज समस्या, पाणीटंचाई!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

राज्यातील सर्व भागामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा पोहचला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जरी घोषणा केली तरी राजधानी पणजीच्या शेजारी असलेल्या सांताक्रुझ मतदारसंघात लोकांना वीज व पाण्याच्या समस्येला कित्येक वर्षापासून सामोरे जावे लागत आहे.

पणजी :  राज्यातील सर्व भागामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा पोहचला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जरी घोषणा केली तरी राजधानी पणजीच्या शेजारी असलेल्या सांताक्रुझ मतदारसंघात लोकांना वीज व पाण्याच्या समस्येला कित्येक वर्षापासून सामोरे जावे लागत आहे. या परिसरात अनेक ठिकाणी जुन्या विहिरी आहेत मात्र त्याची साफसफाई वेळोवेळी झाली नसल्याने त्या प्रदूषित झाल्या असल्याने या मतदारसंघात नळ्याने होणाऱ्या अपुऱ्या प्रमाणातील पाणीपुरवठ्यामुळे पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

 सांताक्रुझ मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने या परिसराचा विकासच झाला नाही. पाणी व वीज समस्या ही गेल्या दोन दशकापासून आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याने या भागात असलेली जुनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन बदलण्यात आलेली नाही. काही भागात घालण्यात आलेल्या पाईपची रुंदी कमी असल्याने, अनेक ठिकाणी त्यातून पाण्याची गळती होत असल्याने तसेच पाण्याचा दाब खूपच कमी असल्याने लोकांना पाणी मिळत नाही. काहीवेळा अर्धा तास जर पाणी आले तर त्याचा दाब खूपच कमी असल्याने इमारतीमधील पाण्याच्या टाकीपर्यंत ते वर चढत नाही. अशा स्थितीत लोकांना नळाचे पाणी इमारतीतून खाली उतरून भरावे लागते अथवा पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची पाळी येत आहे. त्यामुळे राज्यात नळाद्वारे सर्व भागात पाणीपुरवठा होत असल्याचा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांच्याही निदर्शनास लोकांनी आणून दिले आहे मात्र नेहमीप्रमाणे हा मतदारसंघ सरकारकडून दुर्लक्षिला जात आहे. या मतदारसंघातील आमदार सरकारकडून म्हणावे तसे महत्त्व दिले जात नसल्याने ही नामुष्की ओढवली असल्याचा सूर लोकांमध्ये आहे. 

पाण्याप्रमाणेच सांताक्रुझमध्ये विजेची समस्या खूपच वाईट आहे. वेळोवेळी विजेचा लपंडाव सुरूच असतो. ३० वर्षापूर्वी या भागात जुन्या वीज वाहिन्या आहेत त्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार तुटण्याच्या घडत आहे. बांबोळी येथे वीज उपकेंद्र आहे मात्र तेथे असलेला कर्मचारी वर्गही खूपच कमी आहे. या केंद्रामध्ये सांताक्रुझ व सांत आंद्रे या दोन्ही मतदारसंघाचा भाग समावेश केला गेला आहे त्यामुळे तक्रारी देऊनही वेळेत वीजप्रवाह सुरू केला जात नाही. यासंदर्भात या केंद्राचे सहाय्यक अभियंता विचारले असता ते म्हणाले, कर्मचारी वर्गाचा तुटवडा तसेच वाहनाची समस्या आहे. एक - दोन वाहनेच असल्याने नादुरुस्त वीजपुरवठा तक्रारींची दखल घेऊन त्या वेळेत करण्यामध्ये अडचणी येत आहेत. पणजी ते बांबोळी महामार्ग झाल्यापासून सांताक्रुझ मतदारसंघातील कालापूर या भागातील रस्ता दिव्यांची सोयीकडे दुर्लक्ष झाले आहे. पथदीप खरेदी करण्याचे अधिकार पंचायतींना देण्यात आले आहे व ते लावण्याचे काम वीज कर्मचारी करतात. पंचायत व वीज कर्मचारी यांच्यात समन्वयच नससल्याने या मतदारसंघातील अनेक भागात पथदीप पेटत नाहीत. त्यासाठी पंचायतीकडून प्रयत्न केले जात नाही त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. 

या भागात गेल्या काही वर्षात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूने चालत जाणारे पादचारी वाहन चालकांना दिसत नाही. वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना सावधगिरी बाळगून जावे लागते. गुन्हेगारांचे या भागात वास्तव्य असल्याने एखादा अपघात झाला तर वाहन चालकाची चुकी नसतानाही स्थानिक लोक जमा होऊन त्या वाहन चालकाला दम देऊन लुटण्याचे प्रकार घडत आहे. हा परिसर जुने गोवे पोलिस स्थानकाच्या अधिकार क्षेत्रात येतो मात्र पोलिस वाहनांची गस्तही कधी दिसत नाही. काळोखामुळे गुन्हेगारांचेही चांगलेच फावले आहे.

 

संबंधित बातम्या