सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणी जेनेटो कार्दोजला पाच दिवस कोठडी 

विलास महाडिक
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

त्याने सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला गेला होता. त्याने उच्च न्यायालयात अर्जही केला होता मात्र पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांचीच सतावणूक करून दहशतीचे वातावरण तयार केल्याने त्याला शरण येण्यापासून पर्याय उरला नव्हता. त्यामुळे काल तो शरण गेला होता.

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणाशी संबंध असलेल्या संशयित जेनेटो कार्दाज याला आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरू करून त्याच्याशी संबंधित असलेल्या तसेच त्याच्या कुटुंबियांच्या नाड्या आवळल्यानंतर तो पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी त्याला देण्याची मागणी केली होती मात्र त्याच्या वकिलांनी हरकत घेऊन कमीत कमी ती द्यावी अशी विनंती केली होती. 
या प्रकरणाला दोन महिन्याहून अधिक काळ लोटला तरी मुख्य सूत्रधार असलेला संशयित जेनेटो कार्दोज फरारी होता. या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांनी त्याच्या नावाचा उल्लेख पोलिसांना दिलेल्या जबानीत केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातही त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांना पाठवून शोधाशोध सुरू केली होती. या दरम्यान त्याने सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला गेला होता. त्याने उच्च न्यायालयात अर्जही केला होता मात्र पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांचीच सतावणूक करून दहशतीचे वातावरण तयार केल्याने त्याला शरण येण्यापासून पर्याय उरला नव्हता. त्यामुळे काल तो शरण गेला होता. जुने गोवे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत खुनाचा प्रयत्न व कटकारस्थानचा गुन्हा नोंदविलेला आहे. 
पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी संशयित जेनेटो कार्दोज याला दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. सांताक्रुझ टोळीयुद्ध घडल्यानंतर त्याचे नाव तपासात समोर आल्यापासून तो फरारी होता. त्यामुळे तपासकामही खोळंबले. त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. हे प्रकरण दोन गुंडांच्या टोळीच्या पूर्ववैमनस्यातून घडले असल्याने त्याची सखोल चौकशीसाठी तो अधिकाधिक दिवस कोठडी हवा आहे. यावेळी संशयितांच्या वकिलांनी या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीला विरोध केला. सांताक्रुझ टोळीयुद्धाशी त्याचा काहीच संबंध नाही. पोलिस त्याला या प्रकरणात अडकवत आहेत. तपासकाम पूर्ण झाले असून सर्व संशयितही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे कमीत कमी कोठडी देण्याची विनंती त्यांनी केली. संशयिताच्या वकिलांना त्याला भेटण्यास तसेच कोठडीत त्याला मारहाण झाल्यास त्वरित तक्रार दाखल करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती वकिलांनी केली. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेऊन पाच दिवसांची पोलिस कोठडी तसेच परवानगीसाठी केलेली विनंती मान्य केली. 
दरम्यान, संशयित जेनेटो कार्दोज याने उच्च न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात येणार आहे. त्याचा जामीन अर्ज उद्या (१४ ऑगस्ट) सत्र न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली.  

 goa goa goa 
 

संबंधित बातम्या