सर्वण येथील नैसर्गिक तळी उध्दाराच्या प्रतीक्षेत

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

कोमुनिदादच्या आडकाठी धोरणामुळे अनेक वर्षांपासून प्रस्ताव शीतपेटीत

तुकाराम सावंत
डिचोली

जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ उध्दाराच्या प्रतीक्षेत असलेली डिचोली तालुक्‍यातील सर्वण येथील तळी प्रदुषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात असून तिचे अस्तित्व संकटात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक कोमुनिदादच्या नकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या या तळीचा उध्दार करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. भविष्याची गरज ओळखून अडीच वर्षापूर्वी स्थानिक पंचायतीने या तळीच्या विकासाचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, तळीचा विकास करण्यास स्थानिक कोमुनिदादकडून ‘ना हरकत दाखला’ मिळत नसल्याने या तळीच्या उध्दाराचा प्रस्ताव जवळपास शीतपेटीत पडल्यातच जमा आहे.
एका बाजूने नैसर्गिक जलस्त्रोते नामशेष होत असून भविष्याची उपाययोजना म्हणून उरल्यासुरल्या जलस्त्रोतांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. तसा संदेशही सरकार तसेच पर्यावरणप्रेमींकडून मिळत असतो. दुसऱ्या बाजूने नैसर्गिक जलस्त्रोतांचा विकास करण्यास कोमुनिदादीसारख्या स्थानिक संस्थाच कसा ‘खो’ घालतात. त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सर्वण येथील नैसर्गिक तळीचे संवर्धन होणे काळाची गरज आहे, असे मत स्थानिक पंच रमेश सावंत यांनी व्यक्‍त केले आहे.

तळीचे अस्तित्व संकटात
येथील श्‍यामपुरुष मंदिरासमोर साधारण ४०० मीटर अंतरावर कोमुनिदादच्या जागेत (सर्व्हे क्र. १२९/०) ही तळी आहे. बाराही महिने पाण्याने वाहणारी ही तळी म्हणजे गावचे वैभव आहे. एक काळ म्हणजेच २५-३० वर्षांपूर्वी या तळीच्या पाण्यावर गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वायंगण शेती करायचे. कुळागरांसाठीही ही तळी वरदान आहे. नाही म्हटले तरी अजूनही काही महिला या तळीवर कपडे धुण्यासाठी जातात. तीस वर्षांपूर्वी सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे या तळीतील गाळ उपसण्यात आला होता. त्यानंतर मात्र या तळीकडे कोणीच लक्ष दिले नाही. सध्या या तळीला अत्यंत विदारक स्वरूप प्राप्त झाले आहे. सभोवतालच्या माडांची झावळे, पालापाचोळा आदी गाळ साचून ती बुजत आहे. पाण्याची पातळीही दिवसेंदिवस घटत आहे. या तळीचे संवर्धन करण्यासाठी वेळीच उपाययोजना केली नाही, तर भविष्यात तिचे अस्तित्व संकटात येणार हे ठरलेले आहे.

प्रशासकांच्या सुचनेकडे दुर्लक्ष
या तळीचे संवर्धन व्हावे यासाठी स्थानिक पंचायतीने अडीच वर्षापूर्वी तळीतील गाळ उपसून तिचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही तळी कोमुनिदादीच्या जागेत येत असल्याने पंचायतीने कोमुनिदादकडे ‘ना हरकत दाखला’ मागितला. मात्र, कोमुनिदाद मंडळाकडून तो देण्यास टाळटाळ झाली. त्यानंतर पंचायतीने डिसेंबर २०१७ या वर्षी उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासकांना पत्राव्दारे कोमुनिदादच्या भूमिकेविषयी कल्पना दिली. या पत्राची दखल घेवून कोमुनिदादचे तत्कालीन प्रशासक गौरीश शंखवाळकर यांनी सर्वण कोमुनिदादला पत्र पाठवून तळीच्या विकासकामासाठी आवश्‍यक निर्णय घेवून ना हरकत दाखला देण्याची सूचना केली होती. मात्र, प्रशासकांच्या त्या सुचनेकडे कोमुनिदाद मंडळाने आजपावेतो दुर्लक्ष केल्याची माहिती मिळाली आहे. तळीच्या विकासकामासाठी कोमुनिदादकडून ‘ना हरकत दाखला’ मिळाला नसल्याचे पत्र मागील जानेवारी महिन्याच्या २ तारखेला पंचायतीने कोमुनिदाद प्रशासन कार्यालयाला दिले आहे, तर मागील मार्च महिन्यात मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी या तळीची पाहणी करून तळीचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र, ‘ना हरकत दाखला’ मिळत नसल्याने या तळीच्या विकासाच्या प्रस्तावाला चालना देण्यास अडथळा निर्माण झाला आहे

संबंधित बातम्या