‘क्वारांटाईन’च्या नावाखाली कोट्यवधीचा भ्रष्टाचार 

विलास महाडिक
शुक्रवार, 31 जुलै 2020

बिकट परिस्थितीत सापडलेल्या या गोमंतकियाकडून लूट सुरू आहे. हॉटेल चालकांकडून कशाप्रकारे हप्ता वसूल केला जातो त्याचे पुरावे पक्षाने जमा केले आहेत. या घोटाळ्याला उच्चस्तरीय अधिकारी व काही राजकारण्यांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही.

पणजी,

परदेशात अडकून पडलेल्या गोमंतकियांना गोव्यात आल्यावर दाबोळी विमानतळावर कोविड चाचणी केल्यानंतर ठराविक हॉटेलमध्येच स्वखर्चाने संस्थात्मक क्वारांटाईन होण्याची सक्ती केली जात आहे. चाचणी अहवाल जाणुनबुजून विलंब करून क्वारांटाईनच्या नावाखाली हॉटेल चालक व सरकारी अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे हे घोटाळेबहाद्दर सरकार असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाने केला आहे. या क्वारांटाईन घोटाळ्याची लोकायुक्तकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याची पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी आज दिली. 
पणजीतील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कामत म्हणाले की, कामगार कल्याण निधी वितरणाचा घोटाळा 
उघड झाल्यानंतर त्यापाठोपाठ सरकारचा हा क्वारांटाईन घोटाळा समोर आला आहे व यासंदर्भातचे पुरावे आहेत. परदेशातून गोव्यात येणाऱ्या दर्यावर्दी तसेच इतर गोमंतकियांना क्वारांटाईनसाठी काही हॉटेल्सना परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना येथील 
दाबोळी विमानतळावर आल्यावर कोविड चाचणी केली जाते व अहवाल येईपर्यंत क्वारांटाईन होण्यासाठीची उपलब्ध असलेल्या काही 
ठराविक परवानगी दिलेल्या हॉटेलची यादी दाखविली आहे. जर एखाद्याने येण्यापूर्वी गोव्यात सरकारने परवानगी दिलेल्या हॉटेलामध्ये क्वारांटाईनसाठी आरक्षण केलेले असल्यास तेथे जाण्यास विमानतळावरील सरकारी अधिकाऱ्यांकडून जाऊ दिले जात नाही. त्यामुळे जे हॉटेल चालक सरकारी अधिकाऱ्यांना क्वारांटाईनसाठी प्रत्येक व्यक्तीमागे ५०० ते ७०० रुपये दरदिवशी देतात त्यांचीच नावे यादीत 
असतात. सरकारी अधिकारी व हॉटेल चालकांनी कटकारस्थान करून कोविड महामारीच्या नावाखाली परदेशातून गोव्यात येणाऱ्या गोमंतकियांची लूट चालविली आहे असा आरोप कामत यांनी केला. 
आतापर्यंत गोव्यात सुमारे ११ हजार परदेशी गोमंतकिय चार्टर्ड विमाने तसेच वंदे भारत विमानाने गोव्यात आले. त्यांच्याकडून दाबोळी विमानतळावर आल्यावर कोविड चाचणी शुल्क तसेच विमानतळावरून यादीत असलेल्या ठराविक हॉटेलमध्ये क्वारांटाईन होण्यासाठी जाण्यासाठी कदंब प्रवास शुल्क म्हणून प्रत्येकी ५०० रुपये घेतले जातात. त्यानंतर क्वारांटाईनसाठीची हॉटेल चालकाकडून मिळणारी ठराविक रक्कम यामुळे देशात टाळेबंदी सुरू झाल्यापासून सुमारे ५ ते ६ कोटींचा घोटाळा आजवर झाला आहे. क्वारांटाईन नावाखाली परदेशातून येणाऱ्या गोमंतकियांना लुटण्याची संधी सरकारी यंत्रणेने सोडली नाही. महामारीमुळे तर काहीं नोकऱ्या गमवाव्या लागल्याने मायभूमीत परतले आहेत. अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या या गोमंतकियाकडून लूट सुरू आहे. हॉटेल चालकांकडून कशाप्रकारे हप्ता वसूल केला जातो त्याचे पुरावे पक्षाने जमा केले आहेत. या घोटाळ्याला उच्चस्तरीय अधिकारी व काही राजकारण्यांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे सरकारने दाबोळी विमानतळावर नियुक्त केलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची तेथून बदली करावी ही भ्रष्ट साखळी मोडून काढावी. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करावी मागणी गोवा फॉरवर्डतर्फे करण्यात आली. 
या खासगी हॉटेलातील संस्थात्मक क्वारांटाईन घोटाळ्यासंदर्भातचा दस्ताऐवज पक्षाच्या कायदा सल्लागार पथकाकडे तपासणीस दिली जाणार आहेत. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठीची तक्रार गोवा लोकायुक्तकडे दिली जाणार आहे. यापूर्वी कामगार कल्याण निधी वितरणातील घोटाळ्याची दखल लोकायुक्तने घेतली होती. काही ठराविक हॉटेलची नावे असलेल्या यादीवर कोणत्याच खात्याचे नाव किंवा अधिकाऱ्याची सही नसते. क्वारांटाईन झाल्यानंतर किमान सात दिवस कोविड चाचणी अहवालच उघड केला जात नाही. पर्यटन काळात असलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक रक्कम हॉटेल चालकांकडून आकारली जाते व त्याना विचारणारेही कोणी नसते कारण सरकारी यंत्रणाच या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली आहे अशी टीका कामत यांनी केली. 

संबंधित बातम्या