दंत महाविद्यालयातील भरती प्रक्रियेत घोटाळा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

दंत महाविद्यालयात भरती प्रक्रियेदरम्यान घोटाळा झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रभारी राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

पणजी:  दंत महाविद्यालयात भरती प्रक्रियेदरम्यान घोटाळा झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रभारी राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. भरती प्रक्रिया घोटाळा हे सरकारच्या वाईट व भोंगळ कारभाराचे तसेच भाजपकडून गोव्यात अतिशय खोलवर रुतलेल्या भ्रष्टाचाराचे अजून एक वेगळे मोठे उदाहरण आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले, आरोग्य खात्यातर्फे कायमस्वरूपी नियमित पातळीवर काम करण्यासाठी ३७ परिचारीका  भरतीसाठी प्रक्रिया सुरू करून जागा भरणे असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण धक्कादायक बाब अशी आहे की मुलाखती आणि परीक्षा घेऊनही त्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र मंत्र्यांच्या मर्जीतल्या व नामांकित केलेल्याच उमेदवारांना नियुक्ती पत्रे जारी करण्यात आल्याने ही नियुक्ती वादग्रस्त ठरली आहे. निकाल जाहीर झालेले नाहीत तरीही ३७ परिचारिका आपल्या कामावर यापूर्वीच रूजू झालेल्या आहेत.  परिचारीका म्हणून रुजू झालेल्या बहुतेक उमेदवार महिला या सत्तरी तालुक्यातील आहेत. 

ते म्हणाले,  निकाल जाहीर होण्यापूर्वी नियुक्तीपत्रे कशी जारी केली जाऊ शकतात. केवळ सत्तरी तालुक्यातील उमेदवारांनाच पहिली पसंती कशी दिली जाऊ शकते. बहुतेक उमेदवार या सत्तरी तालुक्यातीलच का आहेत. उमेदवारांना मोठ्या रांगांमध्ये उभे करून आणि परीक्षा देण्याचा उपद्व्याप व उठाठेव कशाला करायला लावली. त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील उमेदवारांचे नाव पुकारून त्यांना घेता आले असते. एवढे मोठे नाटक कशासाठी करण्याची गरज होती.  गोमेकॉमधील बीएससी नर्सिंगसाठीच्या जागा भरताना कंत्राटी पद्धतीवर आधीच काम करणाऱ्या उमेदवारांकडे परस्पर दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना नोकरीत कायम करण्याविषयी काहीच विचार करण्यात आला नाही. परिचारीका पदावर काम करणाऱ्या या महिला उमेदवार गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कंत्राटी पद्धतीवर सेवेत कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या