शाळांना मिळणाऱ्या दिवाळी आणि नाताळाच्या सुट्यांमध्ये कपात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने या काळात बराच शैक्षणिक कालावधी खर्च झाल्याने तो भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पणजी- राज्याच्या शिक्षण संचालनालयाने २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळांना मिळणाऱ्या दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कपात केली आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने या काळात बराच शैक्षणिक कालावधी खर्च झाल्याने तो भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दिवाळीच्या सुट्यांमध्ये आठ दिवसांची कपात करण्यात आली असून ख्रिसमसच्याही सुट्या दोन दिवसांनी कमी करण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या सुट्या 9 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत याआधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, यात कपात करून आता सर्व शाळांना 9 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यानच सुट्या असतील. दिवाळीच्या सुट्यांमध्ये 8 दिवसांची कपात जरी करण्यात आली असली तरी 26 तारखेला तुळशी विवाहानिमित्त विद्यार्थ्यांना एक सुट्टी देण्यात आली आहे. तसेच नाताळाच्याही सुट्यांमध्ये दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. नाताळाच्या सुट्या 24 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्यातही दोन दिवसांची कपात करण्यात आली असून या सुट्या 24 डिसेंबरला सुरू होऊन 31 डिसेंबरलाच संपणार आहेत.    

राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा यात समावेश करण्यात आला असून सर्व शासकीय, अनुदानित तसेच विनानुदानित शाळांसाठी ही सुचना लागू असेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी आणि नाताळाच्या सुट्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी प्रसिद्ध केली आहे.  

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी याआधीच जुनमध्ये या सुट्या कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या सुट्या कमी करण्यात आल्या असून याद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोरोनामुळे गोव्यातील शाळा अजूनही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, राज्य सरकार लवकरच शाळाही सुरू करण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी हालचाली करण्यात येत आहेत. 

संबंधित बातम्या