शाळांना मिळणार ६० लाखांचा निधी

two-school-students-wearing-protect-mask
two-school-students-wearing-protect-mask

पणजी :

शाळेतील मुलांचा विचार करून कोरोनाविषयी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन व जागृती करण्यासाठी राज्याला ६० लाख रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. शाळा सुरू झाल्यावर खरे आव्हान सुरू होणार असून कोरोना विषाणूपासून शालेय मुलांचे रक्षण व्हावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशभरासह सध्या राज्यही कोरोना महामारीला तोंड देत आहे. शाळा सुरू झाल्‍यानंतर खरे आव्हान आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये जागृती व उपाययोजनांसाठी ६० लाख रुपयांचा निधी केंद्राकडून राज्याला मिळणार आहे. ज्यामधून लहान मुले व पालकांसाठी सुरक्षाविषयक काळजी व जागृती करण्यात येणार आहे. राज्याला हा निधी समग्र शिक्षा अभियान या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राकडून देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितींनाही जागृती कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे लागणार आहे.

शिक्षकांना समुपदेशनासाठी अनुदान
महामारीच्या काळात शालेय अभ्यासक्रम आणि वर्गाचे वेळापत्रक यांच्याशी जुळवून घ्यायला विद्यार्थी व पालकांना शाळांच्या व्यवस्थापन समित्यांनाही मदत करण्याचे आवाहन या निर्देशामध्ये आहे. विद्यार्थ्यांना नवीन वातावरण व परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मदत करताना शिक्षकांना समुपदेशन करावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांनाही आर्थिक अनुदान मिळणार आहे. लहान मुलांची सुरक्षा आणि शिकण्याची प्रक्रिया याच्यामध्ये पालक महत्त्‍वाची भूमिका बजावणार असून पालक शिक्षक संघाच्या बैठका, व्हॉट्स ॲप अथवा फोनवर होणाऱ्या सत्रांच्या आधारे शिक्षकांनी पालकांना मदत करणे अपेक्षित असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्याला दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

शिक्षणासह अन्‍य उपक्रमांचेही मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चित्रकला, पेंटिंग, गोष्टींची पुस्तके वाचणे, कथा लिहिणे यासारख्या उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले जाणार असून या गोष्टींच्या मदतीने एखादे नवीन कौशल्य शिकणे किंवा आहे त्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी त्यांना मदत केली जाणार आहे. समाज माध्यमांवरील बातम्या वाचताना, ऐकताना वा बघताना त्यांना अधूनमधून विश्रांती दिली जाणार आहे. शिथिलीकरण व्यायाम, शरीर ताणणारे व खोलवर श्वासोश्वास करायला लावणारे योग प्रकार, योगासने, ध्यान धारणा हे उपक्रम त्यांच्यासाठी घेतले जातील. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक व संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पूर्ण झोप घेणे व त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालविणे यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे लागणार असल्याचे या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका बैठकीमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शाळा व्‍यवस्‍थापन समिती
प्रशिक्षणासाठी २५ लाख
राज्यातील शाळांमधील कार्यरत असलेल्या एकूण ७४० शाळा व्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्याला २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. शाळेत मुलांमध्ये कुठल्याही प्रकारच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये व मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कुठले सावधगिरीचे उपाय योजले जावेत, यासाठी मार्गदर्शन व जागृती या समितीच्या सदस्यांमध्ये केली जाणार आहे.

शैक्षणिक अधिकाऱ्यांनाही जागृतीचे निर्देश
कोरोनासंदर्भातील अफवा पसरविणाऱ्या घटनांची पडताळणी व चुकीच्या माहितीविषयी जागृती करणे आवश्यक आहे. येणारी माहिती ही अधिकृत स्रोतांमधून आलेली असावी. या स्रोतांमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, आयसीएमआर, विश्व आरोग्य संघटना (डब्लूएचओ ) आणि युनिसेफ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश असल्याचे मंत्रालयाने राज्याला जारी केलेल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.
राज्यातील शैक्षणिक अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले की, पालकांमध्ये मुलांच्याबाबतीत संवेदना व समजूतदारपणा निर्माण करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांना समजूतदारपणे व सकारात्मकपणे प्रतिसाद द्यावा. सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेतानाही जी प्रतिक्रिया आहे, ती सर्वसामान्य अथवा स्वाभाविक असायला हवी, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

पालक-शिक्षकांना
जागृतीसाठी १२ लाख
शिक्षक व पालकवर्गासह एकूण विविध समुदायांमध्ये जागृती करण्यासाठी १२ लाख रुपयांचा निधी गोवा राज्याला केंद्राकडून मंजूर केला आहे. या उपक्रमामध्ये विविध समुदायातील सदस्यांना शाळा सुरू केल्यावर व चालविताना कुठले खबरदारीचे उपाय योजावेत, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांकडून दर पंधरवड्यात बैठका आयोजित केल्या जातील. ज्याच्या आधारे योजना आणि ‘कोविड -१९’च्या अंतर्गत खबरदारीचे उपाय व सूचना याविषयी जागृतीपर प्रबोधन केले जाईल, असे मंत्रालयाकडून राज्याला कळविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com