Cyclone Tauktae: आजच्या वादळाचे 12 वर्षांपूर्वी केले होते भाकीत, मात्र...

दैनिक गोमंतक
रविवार, 16 मे 2021

शास्त्रज्ञाने दिलेल्या इशाऱ्याकडे सरकारी यंत्रणा असो वा जनता सर्वांनीच फारसे गांभीर्याने पाहिले नाही.

पणजी: सध्या चक्रीवादळाचीच चर्चा आहे, वादळ कधी धडकेल याची चिंता प्रत्येकाला आहे. मात्र, 12 वर्षांपूर्वी अशी वादळे येतील याचे भाकीत एका शास्त्रज्ञाने केले होते. त्याने दिलेल्या इशाऱ्याकडे सरकारी यंत्रणा असो वा जनता सर्वांनीच फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे वादळाला तोंड देण्याची राज्य पातळीवरील व्यवस्था अद्याप बाल्यावस्थेतच राहिली आहे. किनारी राज्य म्हणून जी तयारी करायला हवी त्या पातळीवर अंधारच आहे. (Scientists predicted today's storm 12 years ago)

दोनापावल (Dona Paula) येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (एनआयओ) माजी संचालक प्रसन्नकुमार यांनी 2009 मध्ये लिहिलेल्या शोधनिबंधात अरबी समुद्रात (Arabian Sea) उदय होणाऱ्या वादळांच्या प्रमाणात वाढ होणार असे नमूद केले होते. सध्या घोंगावत असलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘होय मी तसा इशारा तेव्हाच दिला होता’ असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले, निसर्गात कोणत्याही कृतीला दुसऱ्या कृतीने निसर्ग उत्तर देत असतो. आपण फक्त क्रियेला कोणती प्रतिक्रीया येऊ शकते याचा अंदाज लावू शकतो. त्यासाठी उपलब्ध माहितीचे योग्य असे विश्लेषण करावे लागते. आम्ही तो प्रयोग केला आणि त्यात आम्हाला यश आले. अलीकडच्या काही वर्षांत वादळांची वाढलेली संख्या आणि तीव्रता पाहिल्यास आम्ही काढलेले निष्कर्ष योग्य असेच होते असे दिसून येते.

CYCLONE TAUKTAE: तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर

जागतिक तापमानवाढ आणि वादळे यांचा जवळचा संबंध आहे. विविध कारणांमुळे आणि मानवाच्या अनिर्बंध वागण्यामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. शास्त्रज्ञ वगळता अन्य कोणाला तापमानवाढीची  चिंता नाही. आपत्ती व्यवस्थान करून हा प्रश्न सुटणारा नाही. वादळे का होतात हे समजून घेतले जात नाही. निर्माण होणारी उष्णता आपल्या पोटात सामावून घेण्याची मोठी ताकद समुद्रात आहे. वातावरणातील उष्णता समुद्र शोषून घेतो, पण त्यालाही मर्यादा आहे. ती मर्यादा ओलांडली गेली की समुद्रातून ती उष्णता बाहेर पडू लागते. त्यातून वादळाचा जन्म होतो. वादळ होते म्हणजे समुद्राच्या पोटात सामावली गेलेली उष्णता वातावरणात परत येते असा त्याचा सरळ, साधा, सोपा अर्थ आहे अशी माहीती प्रसन्नकुमार दीली आहे. 

1960 ते 2009 पर्यंतच्या उपलब्ध माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करून आम्ही वादळे निर्माण होण्याची कारणे विषद केली होती. त्याकाळात बंगालच्या उपसागरात वादळांची संख्या अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त होती. आता अरबी समुद्रातही वादळांची उत्पत्ती होऊ लागली आहे. पूर्वी वादळांची तीव्रता कमी असे, आता तीव्रता वाढू लागली आहे. तोही संशोधनाचा विषय आहे. त्यावरही शोधनिबंध लिहिणार आहे, असे देखील प्रसन्नकुमार यांनी स्पष्ट केले आहे. 

संबंधित बातम्या