टाकाऊ लाकडांना दिले देखणे बहुरूप

पद्माकर केळकर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

भुईपाल येथील सूर्यकांत गावकर यांनी घडविल्या देवी, देवतांसह अनेक कलाकृती

वाळपई: माणसांना एखाद्या गोष्टीचा छंद जडला की ती व्यक्ती त्या छंदात न्हाऊन जात असते. त्यातही कलाकृती करण्याचा मोह असल्यास अगदी लहान सहान वस्तूंचा वापर करून त्या वस्तूंना विविध रूप, आकार देत असतो. असाच एक लाकडापासून हुबेहूब देवी देवतांसह अनेक विविध मूर्ती बनविणारा म्हणून सत्तरी तालुक्यात भुईपाल येथील रहिवासी सूर्यकांत गावकर प्रसिद्ध आहे. 

श्रीराम, विठ्ठल, आई, गणपती, मगर, दीपस्तंभ, कासव, काल्पनिक कला, मयूर, लक्ष्मी, मासे, देवी, मस्त्सगंधा, दगडात कोरलेला मच्छराज, बदक, विविध राजांचे मुखवटे, होडीत विहार करणारे जोडपे, नटराज, दगडात कोरलेले तांबडीसुर्लाचे मंदिर, अप्सरा, हत्ती, चिमणी, समई, गुलाब, कृष्ण, मासेवाली अशी विविध कलाकृती केली आहे. तसेच ५७ गणपतीचे विविध रूप तसेच राशीगणेश ही कोरीव कला अल्युमिनियम पत्र्याचा वापर करून साकारली आहेत. १९९६ पासून ही कला सूर्यकांतने जोपासली आहे. 

कोकम, सागवान, फणस अशा झाडांची टाकाऊ लाकडात कोरीव काम केले आहे. सूर्यकांत हे खासगी कंपनीत काम करून वेळ मिळतो तसा हे काम  करतात. रात्राचेही जागून काम टाकाऊ वस्तूत कला साकारत आहे. त्यांनी आपल्या घरात ही कोरीव चित्रे ठेवली आहेत. कधी कोणी घरी भेटण्यास आला, तर ही कोरीव चित्रे पाहून थक्क होतात. सूर्यकांत गावकर यांची अगदी साधी रहाणीमान आहे. त्यांनी कोणाकडे ही कला शिकून घेतली नाही, तर एखाद्या वस्तूंचे निरीक्षण करून पुन्हा पुन्हा त्यावर काम करून कला साकारत आहे. सूर्यकांत यांच्या हातांना कलेची कल्पकता आहे. 

ते म्हणाले, टाकाऊ लाकडांवर कोरीव काम करणे सोपे नाही. त्यासाठी बरीच पराकष्टा संयम बाळगावा लागतो. कारण हे काम किचकटीचे असते. आपण लाकडावर अमूक कलाकृती करणार असे ठरविल्यावर ती कलाकृती करताना त्यातील एखादे जरी अंग चुकीचे कोरले तर त्याचे वेगळेच कोरीव चित्र बनते. म्हणूनच या कामात बारकाईने लक्ष देऊन काम करावे लागते. आपल्या परिसरात फिरताना अनेक टाकाऊ लाकडे, दगड पडलेले असतात. त्यांचाच वापर करून कोरीव काम केले आहे. निसर्ग ही माणसांना मिळालेली दैवी देणगी आहे. या निसर्गाचे संवर्धन झाले पाहिजे. या निसर्गातील गोष्टींचा योग्य पध्दतीने वापर केला, तर त्यांना चांगला आकार मिळतो. आपण निसर्गातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून ही कला अंगिकारली आहे.

विशेष करून प्रभू श्रीरामांची टाकाऊ लाकडावर कोरलेली मूर्ती अतिशय देखणी सुरेख दिसत आहे. एकूणच सर्व कलाकृतीत हुबेहूबपणा दिसून येतो.

goa

संबंधित बातम्या