यंदाच्या हंगामात काजू शेतकऱ्यांचे उत्पन्न १५० कोटी

Uttam Gaokar
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

राज्यात पडिक राहिलेली अधिकाधिक जमिन काजू लागवडीखाली आणण्याच्या तसेच आर्थिकरित्या सक्षम नसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात काजू कलमांची खरेदी करुन लागवड करण्यास मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने काजूच्या कलमांवर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यास सुरवात केली आहे

सासष्टी, : कोरोना स्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी काजूला असलेल्या १०० रुपयांच्या आधारभूत दरात आणखीन २० रुपये वाढ करून आर्थिक मदत केली असून, राज्यात जास्तीत जास्त जमीन काजू लागवडीखाली आणण्यासाठी अनुदानित दरात काजू कलमे पुरविण्यात आली आहे. काजूचे उत्पन्न वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून यंदाच्या हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी काजूद्वारे एकूण १५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली. मडगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते. व्हिडियोद्वारे सहभागी झालेले मुख्यमंतत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या केंद्राचे उद्‍घाटन झाले. कवळेकर यांनी या कार्यक्रमात बोलताना काजू उत्पादन वाढीवर भर दिला. राज्यात पडिक राहिलेली अधिकाधिक जमिन काजू लागवडीखाली आणण्याच्या तसेच आर्थिकरित्या सक्षम नसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात काजू कलमांची खरेदी करुन लागवड करण्यास मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने काजूच्या कलमांवर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना ६० रुपये दरात मिळणारे काजूचे कलम यंदापासून १५ रुपयांच्या दरात दिलेले आहे. या योजनेचा लाभ फक्त कृषी कार्ड धारकांना नव्हे, तर काजूचे पीक घेणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हावा, यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्ड अनिवार्य करण्यात आलेले नसून, राज्यात कृषी कार्ड नसलेल्या सुमारे २२ हजार शेतकऱ्यांना अनुदानित दारात काजू पुरविण्यात येत आहे, असे बाबू कवळेकर यांनी सांगितले. तर, ज्या शेतकऱ्यांना ही कलमे घेतलेली आहे त्यांना काजूची लागवड करण्यासाठी ३०० रुपये देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या हंगामाच्या सुरवातीला काजू प्रतिकिलो १३६ रुपयांनी विकला जात होता. पण, कोरोनामुळे काजूचे दरात २१ रुपयांनी घट झाला. काजूच्या उतरलेल्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी सरकारने १०० रुपये असलेल्या आधारभूत दरात आणखीन २० रुपयांनी वाढ केली. या आधारभूत दराद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.राज्यात काजूचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. काजूचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामाला 150 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या