पोलिस मुख्यालयात दुसरा कोरोना पोझिटिव्ह 

dainik gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

राज्य गुन्हे नोंदणी विभागातील दोन कॉन्स्टेबल्स कोरोना बाधित आढळून आल्यानंतर या विभागातील कॉन्स्टेबल्सची चाचणी निगेटिव्ह
आली असली तरी त्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घरीच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पणजी

गोवा पोलिस मुख्यालयातील एक कोरोना बाधित कॉन्स्टेबल आढळून आल्यानंतर पुन्हा आणखी एक
पोलिस कॉन्स्टेबल कोविड चाचणीत पोझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे आज पोलिस मुख्यालयातील आवारात निर्जंतुकीकरण केले गेले. आज कोविड पोझिटिव्ह सापडलेल्या कॉन्स्टेबलने पोलिस मुख्यालयातील राज्य गुन्हे नोंदणी विभागातील (एससीआरबी) सहकाऱ्यांना वाढदिवस पार्टी दिली होती. त्यामुळे मुख्यालयातील अनेक पोलिसांमध्ये घबराट पसरली आहे. 
साखळी येथे राहत असलेला व राज्य गुन्हे नोंदणी विभागात (एससीआरबी) काम करत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल कोरोना बाधित
असल्याचे उघडकीस आल्यानंतर या विभागातील सुमारे २४ पोलिसांची तातडीने काल कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीचा
अहवाल आज पहाटे आल्यावर त्यातील एकजण पोझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला सकाळीच त्याच्या पीर्ण येथील
घरातून कोविड इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. काल व आज सापडलेल्या या पोलिस कॉन्स्टेबल्समध्ये प्राथमिक लक्षणे दिसत
नसल्याने त्यांची रवानगी शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. 
राज्य गुन्हे नोंदणी विभागातील दोन कॉन्स्टेबल्स कोरोना बाधित आढळून आल्यानंतर या विभागातील कॉन्स्टेबल्सची चाचणी निगेटिव्ह
आली असली तरी त्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घरीच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस मुख्यालयात असलेल्या या विभागातील काम स्थगित ठेवले आहे तसेच हा विभाग बंद करण्यात आला आहे. या पोलिस मुख्यालयात पोलिसांच्या कामानिमित्त अनेक फेऱ्या असतात. विदेशगमनविषयक विभाग, पणजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंमलीपदार्थविरोधी कक्ष, मोटार वाहन विभाग, गृहरक्षक कार्यालय, पारपत्र पडताळणी केंद्र, पणजीची सीआयडी विशेष शाखा, पोलिस मुख्यालयाचे सभागृह व 
पलिकडे पणजी पोलिस स्थानक, पणजी वाहतूक पोलिस कक्ष तसेच पोलिस नियंत्रण कक्ष विभाग आहे. या सर्व विभात मिळून सुमारे पाचशेपेक्षा अधिक पोलिस काम करतात व राज्य गुन्हे नोंदणी कक्षाशी कामाच्या निमित्ताने संपर्क येतो. त्यामुळे ज्या पोलिसांना कोविड
चाचणी करायची आहे त्यांना मुभा देण्यात आली आहे.  
या घटनेनंतर आज दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत पोलिस मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेरील बाल्कनी व तेथील स्वच्छतागृहे तसेच तळमजल्यावर असलेला परिसर, अधिकाऱ्यांच्या गाड्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. या निर्जंतुकीकरणावेळी पोलिस मुख्यालयातील सर्व कार्यालयाबाहेरील परिसर तसेच मोटार वाहन विभागातही अग्निशमन दलाचा एका पाण्याच्या बंबमधून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

पोलिस मुख्यालयात असलेला कॉन्स्टेबल कोरोना पोझिटिव्ह सापडल्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आपली कोविड - १९ चाचणी करून घेतल्याची चर्चा आहे. काही पोलिसांनीही स्वतःहून ही चाचणी करण्याचे ठरवले आहे. या आजारीची लक्षणे दिसत नसली तरी कोरोना बाधित होऊ शकतो यामुळे अनेकजण घाबरलेले आहेत. आज पीर्ण येथील दुसरा कॉन्स्टेबल पोझिटिव्ह सापडला आहे तो काल सोमवारी (२९ जुलैला) पोलिस मुख्यालयात कामाला होता. 
 

 

संबंधित बातम्या