गोव्यात आजपासून कोरोनाविरोधी लसीचा दुसरा टप्पा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातसुद्धा उद्या 22 जानेवारी रोजी कोरोनाविरोधी लसीचा दुसरा टप्पा सुरू  होणार आहे. 

पणजी: संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातसुद्धा आज 22 जानेवारी रोजी कोरोनाविरोधी लसीचा दुसरा टप्पा सुरू  होणार आहे.  13 जानेवारी रोजी कोरोनाविरोधी 2350 वेक्सीन गोव्यात दाखल झाले होते.

या प्रत्येक वेक्सीनमध्ये दहा व्यक्तींना लस देण्याची क्षमता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या वेक्सीनद्वारे राज्यातील 23500 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड विरोधी लस टोचता येणार आहे. 16 जानेवारी रोजी राज्य सरकारने निवडलेल्या सातही कोरोना लसीकरण  केंद्रांमध्ये 426 आरोग्य यंत्रणेशी संलग्न व्यक्तींना लस टोचण्यात आली. ज्यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.  गोवा सरकारने चार सरकारी व तीन खासगी इस्पितळांमध्ये वेक्सीन लसीकरण अर्थात कोरोनाविरोधी लस टोचण्याची व्यवस्था केली असून डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधी लस टोचण्यात येणार आहे.

कोरोनामुळे एकाचा मृत्यू
आरोग्य खात्याने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. आज दिवसभरात सासष्टी तालुक्यातील राय येथील एका 85 वर्षीय व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. आज  दिवसभरात 55 नवीन कोरोना रुग्ण सापडले, तर 54 कोरोना रुग्ण बरे झाले.

संबंधित बातम्या