गोव्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात  520 व्यक्तींना कोरोनाविरोधी लस

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

ज्यात आज कोरोनाविरोधी लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला. यापूर्वी 16 जानेवारी रोजी पहिला टप्पा झाला होता.

पणजी:  राज्यात आज कोरोनाविरोधी लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला. यापूर्वी 16 जानेवारी रोजी पहिला टप्पा झाला होता. त्यावेळी राज्यातील सात केंद्रात 470 जनांना कोरोनाविरोधी लस टोचण्यात आली होती. गोवा सरकारने राज्यातील चार सरकारी व दोन खासगी इस्पितळात एकूण सात केंद्रे स्थापून त्यामध्ये लसीकरणाला परवानगी दिली होती.  

आज दुसऱ्या टप्प्यात वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रात 62,  म्हापसा उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात 57, पेडणे प्राथमिक आरोग्य केंद्रात 59,  गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळीतील दोन केंद्रात मिळून 200, व्हीजन  खासगी इस्पितळ म्हापसा 48 व  दक्षिण गोव्यातील व्हिक्टर इस्पितळात 94 अशा एकूण 520 आरोग्याशी संबंधित व्यक्तींना कोरोनाविरोधी लस देण्यात आली.  प्रत्येक केंद्रावर जवळजवळ 100 व्यक्तींना ज्यामध्ये डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लस टोचण्यात येणार होती. गोमेकॉतील दोन केंद्रात 200 लसी टोचण्यात आल्या. इतर केंद्रात त्यापेक्षा कमी टोचण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी शंभर जणांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, काही केंद्रावर काही कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या अडचणी आल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे पूर्ण 100 कर्मचाऱ्यांना लसी टोचण्यात आल्या नाहीत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

गोव्यात महसूलरूपी लॉटरी: सरकारला मिळणार 15. 30 कोटीचा नफा -

राज्यातील जवळजवळ 23 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना तथा कोरोनाविरोधी अभियानात सहभागी झालेल्या डॉक्टर, परिचारिका ,आरोग्य कर्मचारी, अधिकारी व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य खात्याशी संबंधित व्यक्तींना लस टोचणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलिस आणि सुरक्षारक्षक यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील नागरिक तसेच आजारी असलेले नागरिक यांना ही लस टोचण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या