देशातील दुसरे ‘फिलाटेलिक’ संग्रहालय राजधानी दिल्लीनंतर 'गोव्यात' साकारणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

‘जुनं तेच खरं सोनं’ ही उक्ती राज्याच्या टपाल खात्याने सत्यात उतरविली आहे. नवीन इमारत झाल्यानंतर टपाल खात्याचे कार्यालय नवीन इमारतीत हलविण्यात आले, तरी टपाल खात्‍याच्‍या जुन्या आणि स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असणाऱ्या कार्यालयाचे रुपांतर फिलाटेलिक संग्रहालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पणजी : ‘जुनं तेच खरं सोनं’ ही उक्ती राज्याच्या टपाल खात्याने सत्यात उतरविली आहे. नवीन इमारत झाल्यानंतर टपाल खात्याचे कार्यालय नवीन इमारतीत हलविण्यात आले, तरी टपाल खात्‍याच्‍या जुन्या आणि स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असणाऱ्या कार्यालयाचे रुपांतर फिलाटेलिक संग्रहालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीनंतर गोव्यात होणारे हे देशातील दुसरे ‘फिलाटेलिक’ संग्रहालय असणार आहे. राज्याच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब आहे. 

टपाल खात्‍याचे जुने कार्यालय मांडवी नदीतीरी प्रसन्न वातावरणात वसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य टपाल खात्याने प्रसिद्ध केलेली टपाल तिकिटे, तसेच देशभरात आणि जगभरात प्रसिद्ध केलेल्‍या हजारो टपाल तिकिटांचा आणि पाकिटांचा खजाना येथे पाहता येणार आहे. राज्याच्या पोस्ट खात्याला मोठा आणि विस्तृत इतिहास आहे. पोस्टात असणाऱ्या पूर्वीच्या काही वस्तू, जुने दस्तावेज, फोन, स्टॅम्प मारण्याची यंत्रे यासारख्या वस्तूसुद्धा या संग्रहालयात असणार आहेत. या संग्रहालयात गोव्यातील संस्कृती आणि परंपरा दर्शविणाऱ्या अनेक घटकांचा समावेश करण्यात येणार आहे. 

गोमंतकीय संस्कृती आणि परंपरांची माहिती देणारे टपाल खात्‍याचे प्रदर्शन कायस्वरूपी असेल. तसेच तेथे दररोज दिवसाला अनुरुप एखादी संकल्पना घेऊनसुद्धा येथे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. शिवाय अनेकांकडे अंटार्क्टिका खंड, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी तसेच अशा अनेक महान नेत्यांवर, ठिकाणांवर प्रसिद्ध झालेल्या केवळ देशातीलच नाही तर जगभरातील टपाल तिकिटांचा संग्रह असून असे संग्रहसुद्धा येथे पाहता येणार आहेत. या संग्रहासाठी टपाल खात्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने कंबर कसली असून संग्रहालयाचे काम जोमात सुरू आहे. मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत संग्रहालयाचे काम संपूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

प्रत्येकाला भेट द्यायला लावणारे संग्रहालय असेल 

गोमंतकीय संस्कृतीची दर्शन घडवून देणाऱ्या अनेक वेगवेगळे उपक्रम करण्यात येणार आहेत. अनेक वेगवेगळ्या टपाल खात्‍याशी निगडित वस्तू आणि गोष्टींसंदर्भात माहिती देणारे हे संग्रहालय गोव्यातील आणि गोव्यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने पाहायलाच हवे अशा पद्धतीचे असणार आहे. याशिवाय राज्यात अनेक लोकांकडे टपाल खात्‍याशी निगडित काही दुर्मिळ वस्तू, तिकिटे असतील तर त्यांनी पुढे येऊन या गोष्टी पोस्टाच्या संग्रहालयासाठी द्याव्या. या वस्तू संग्रहालयात मांडल्यानंतर देणाऱ्या व्यक्तीचे नावसुद्धा देण्यात येईल. जेणेकरून हा ठेवा येणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल, अशी माहिती राज्य टपाल कार्यालयाचे सिनिअर सुप्रीटेंडेंट डॉ सुधीर जाखेरे यांनी दिली.

 

अधिक वाचा :

गोव्यातील बंद असलेल्या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी अखेरीस खाणपट्टा लिलावाचा पर्याय

पणजीतील मार्केटचा पूर्ण ताबा महापालिकेकडे

गोव्यातील नेऊरमधील रस्त्याच्या प्रस्तावित रूंदीकरणाला स्थानिकांचा विरोध 

संबंधित बातम्या