माध्यमिक ऑनलाईन शिक्षण दोन तासांचेच

1
1

पणजी

राज्यातील विद्यार्थ्यांना दरदिवशी दोन तासांपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन पद्धतीने शिकवले जाऊ नये, असा आदेश शिक्षण खात्याने जारी केला आहे. ३१ जुलैपर्यंत शाळा व शिकवणीचे वर्ग बंद ठेवण्याचा आदेश जारी करतानाच घरातून काम करण्यास शिक्षकांना खात्याने मुभा दिली आहे. प्राथमिक शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाऊ नये, असेही खात्याने म्हटले आहे.
येत्या ३१ जुलैपर्यंत शाळा व शिकवणीचे वर्ग बंद ठेवण्याचा आदेश शिक्षण खात्याने जारी केला आहे. शिक्षकांना घराकडूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. गैरवाजवी पद्धतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांत बोलावले जाऊ नये, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
या आदेशात म्‍हटले आहे, की संस्थाप्रमुखांनी नियमितपणे शिक्षकांच्या संपर्कात असावे, म्हणजे गरजेनुरूप त्यांना शाळेत बोलावले जाऊ शकते. शाळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी असलेली उपकरणे आदींबाबतची माहिती संकलित करावी. ४ जूनपासून शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शिकवल्याची माहितीचे संकलन करावे. शिक्षकांकडून ऑनलाइन शिक्षणासाठीचे आठवडाभरासाठीचे नियोजन घ्यावे.
शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर ऑनलाइन शिक्षणासाठी करावा. दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन वर्ग घेण्यात येऊ नयेत. शिकवणीसाठी मूळ चित्रफिती, पावर पॉइंट सादरीकरण, प्रश्नोत्तरे आदी सुविधांचा वापर करावा. प्राथमिक वर्गांसाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येऊ नयेत मात्र शैक्षणिक साहित्य हे पालकांकरवी विद्यार्थ्यांपर्यंत पुरवावे. त्यातही उपक्रमावर आधारीत शिक्षणावर भर देण्यात यावा. शिक्षकांनी दूरध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहावे आणि विद्यार्थ्यांला घडविणाऱ्यांची भूमिका पार पाडावी. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना आताच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित करावे. व्यक्तिमत्त्व विकास, ताण व्यवस्थापन, समुपदेशन, कृषी आदी विषयांवरील लेखन विद्यार्थ्यांत वितरित करावे.

देखरेख समिती हवी
या साऱ्या ऑनलाइन, ऑफलाईन शिक्षणावर देखरेख करण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने एक देखरेख समिती नियुक्त करावी. त्या समितीवर शैक्षणिक संस्था प्रमुख, व्यवस्थापनाचा प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक-शिक्षक संघाचा सदस्य, भाग शिक्षणाधिकारी व उपलब्ध असल्यास शैक्षणिक तज्ज्ञाची नियुक्ती करावी. ही समिती देखरेख करतानाच दोन महिन्यातून एकदा सर्व व्यवस्थेचा आढावा घेईल.

संपादक ः संजय घुग्रेटकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com