गोव्यातही राष्ट्रवादीचे समर्थक....

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारसरणीचे समर्थन करणारे लोक महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही विपुल संख्येने आहेत,

म्हापसा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारसरणीचे समर्थन करणारे लोक महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही विपुल संख्येने आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोवा निरीक्षक नरेंद्र वर्मा यांनी केला. म्हापसा येथे स्थानिक पत्रकारांशी ते बोलत होते.

गोवा दौऱ्यानिमित्त आज शनिवारी त्यांनी येथील प्रसिद्ध जागृत दैवत श्री बोडगेश्‍वराचे दर्शन घेतले व गोव्‍यात राष्ट्रवादी पक्षाला घवघवीत यश लाभावे, अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे तसेच अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्‍थित होते. बोडगेश्‍वर संस्‍थानचे पुजारी श्याम गोवेकर यांनी निरीक्षक वर्मा यांचे स्वागत करून गाऱ्हाणे घातले.

धर्मनिरपेक्ष लोक नेहमीच राष्ट्रवादीशी सहमत असतात. म्हणूनच गोव्‍यातील जनता पालिका निवडणुकीतही आमच्याच कार्यकर्त्यांना निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यात पक्षबांधणीचे काम हातात घेण्यात येणार असून पालिका निवडणुकीत कार्यकर्ते निश्चितच वर्णी लावतील, असा दावाही त्यांनी केला.

कोविड १९ संदर्भात गोवा सरकारच्या कार्याबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की याबद्दल विशेष टिप्पणी करणे उचित ठरणार नाही, परंतु प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्यापरीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करीत आहे. कोरोना महामारी हे जागतिक संकट आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या फार मोठी असून भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ती फारच कमी आहे. मृत्यूचे प्रमाणही खूप नियंत्रित आहे.

गोव्‍यात येणारे पक्ष निरीक्षक हमखास एखादी जमीन आपणासाठी विकत घेण्याचा प्रयत्न करतात. आपणही त्‍यातलेच का, असे पत्रकारांनी विचारले असता श्री. वर्मा म्हणाले, की मी पक्षकार्यासाठी आलो असून यावेळी वैयक्तिक काम करणार नाही. सध्या पक्षकार्य महत्त्वाचे आहे. गोव्‍यात माझे कौटुंबिक संबंध आहेत. 
त्यामुळे येणेजाणे चालूच असते. निरीक्षक म्हणून प्रथमच पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. ती यशस्वी करण्याच्या प्रयत्नात मी सध्या 
आहे.

संबंधित बातम्या